गटार लाईन स्वच्छता करताना 2 कामगारांचा वायुमुळे गुदमरून मृत्यू #death

चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सास्ती येथे गटार लाईन स्वच्छता करताना 2 कामगारांचा वायुमुळे गुदमरून मृत्यू झालाय. -धोपटाळा येथील वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा कामगार वसाहत परिसरात ही घटना घडली.
आज सकाळी 8 ते 10 फूट खोल गटर स्वच्छतेसाठी कामगार उतरले होते. यादरम्यान आतील वायूमुळे राजू जर्जुला आणि रामजी खंडारकर या कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान वेकोलीच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. या घटनेत सुशील कोरडे नामक अन्य बाधित कामगाराला तातडीने नागपुरात हलविण्यात आले आहे. आणखी 2 कामगारांना वायूची बाधा झाली आहे. त्याच्यावर चंद्रपुरात उपचार केले जात आहेत.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

वेकोली प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बाधित कामगारांची माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. या सर्व घटनेला जबाबदार वेकोली अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी पुढे रेटली. हे मृत्यू नेमके कशामुळं झाले. त्यांना याची कल्पना कशी आली नाही. आजूबाजूला असणाऱ्यांनी काय केले. या दुर्घटनेला कोण जबाबदार आहेत, असे बरेच प्रश्न या घटनेत अनुत्तरित आहेत. याचा तपास करून मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत