Top News

२७ वर्षांपासून निप्पान डेनरोचा प्रकल्प थंड बस्त्यात #bhadrawati


अधिग्रहित शेतजमिनीवर शेतकरी घेत आहेत पिके
शेतक-यांना विश्वासात घेण्याची भूमिपुत्रांची मागणी
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- २७ वर्षांपूर्वी मंजूर झालेला भद्रावती तालुक्यातील निप्पान डेनरो प्रकल्प अजुनही थंड बस्त्यात असून या प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या शेतजमिनीवर शेतकरी पिके घेत असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या प्रकल्पाचे काम सुरु करावे,अशी मागणी वरोरा उपविभागीय अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भद्रावती तालुक्यातील गवराळा, विजासन , चारगाव, ढोरवासा, तेलवासा, पिपरी, चिरादेवी येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, निप्पान डेनरो ( सेन्ट्रल पॉवर इंडिया कंपनी इस्पात ग्रुप ) हा प्रकल्प १९९४ मध्ये मंजूर झाला. या प्रकल्पाला २७ वर्षे पूर्ण झालेले आहेत. तरी अद्याप हा प्रकल्प झालेला नाही. या संदर्भात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दि.६ जुलै २०२१ व ५ जानेवारी २०२२ रोजी तहसील कार्यालय भद्रावती येथे निवेदन दिले. हा प्रकल्प २७ वर्षे झाले तरी पूर्ण झालेला नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. २७ वर्षे पूर्ण झाले असल्याच्या कारणाने शेतकरी त्यांची जमीन समजून उत्पन्न घेत आहेत.
 दरम्यान, दि.३ जानेवारी २०२२ ला एमआयडीसीचे अधिकारी जमीन मोजणी करायला आले असता शेतक-यांच्या समस्या समजून घेऊनच येथे मोजणी करण्यात यावी व प्रकल्प उभा करावा, अन्यथा करू नये. असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. प्रती सातबारावर एक नोकरी व जमिनीचा आजचा भाव देऊन मोजणी करावी व प्रकल्प उभा करावा अशा भावना निवेदनाद्वारे  शासनाला कळविल्या आहेत.   
      अलिकडेच दि.१५ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय वरोरा येथे ४ वाजता बैठक घेणार असल्याचे शेतकऱ्यांना समजले. परंतु ही सुचना त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता व्हाट्सअप द्वारे मिळाली. त्यामुळे वेळेवर कुणीही शेतकरी बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी चार दिवस अगोदर बैठकीची सुचना द्यायला पाहीजे. परंतु तसे न करता अगदी वेळेवर बैठकीला बोलविण्यात आले. त्यामुळे कोणीही शेतकरी बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल करणे आहे, असाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.    
      चार दिवस अगोदर पूर्व सूचना व प्रत्येक शेतकऱ्याला नोटीस देऊन तहसिल कार्यालय भद्रावती येथे बैठक घेण्यात यावी. जेणेकरून संपूर्ण शेतकरी बैठकीला उपस्थित राहिले पाहीजे. तहसिल कार्यालय भद्रावती हे ठिकाण शेतक-यांच्या दृष्टीने अधिक जवळचे व सोईचे आहे. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  एमआयडीसीचे अधिकारी, कंपनीचे अधिकारी व शेतकरी यांच्या समन्वयातून बैठक घेण्यात यावी व नंतर प्रकल्पाला मंजुरी द्यावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 
      निवेदनाच्या प्रती पालकमंत्री        विजय वडेट्टीवार,आ. प्रतिभाताई धानोरकर, आ. सुधीर मुनगंटीवार, तहसिलदार भद्रावती यांना पाठविण्यात आल्या आहेत. 
       निवेदन सादर करताना भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे, माजी नगरसेवक मधुकर सावनकर, गणेश बदखल, नामदेव बदखल, बबन डोये, दिलीप चौधरी, पुंडलिक ढवस आणि इतर प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने