Top News

श्री शिवाजी महाविद्यालयात मतदार जागृती स्पर्धा मार्गदर्शन कार्यक्रम.




(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
राजुरा- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात निवडणूक आयोगाने लोकशाही च्या बळकटीकरणासाठी युवा मतदारांमध्ये लोकशाही, निवडणुका व मतदान याविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केलेले आहे, या स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना विकसित करत राष्ट्रीय पातळीवर आपले नावलौकिक करावे तसेच भारताचे सुजाण व कर्तव्य दक्ष नागरिक निर्माण व्हावा यासाठी श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक व राज्यशास्त्र विभाग आणि तहसील कार्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती स्पर्धा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमाला मुख्य अतिथी व मार्गदर्शक म्हणून राजुरा येथील उपविभागीय अधिकारी मान. श्री संपतजी खलाटे, नायब तहसीलदार श्री अतुल गांगुर्डे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. शि. प्र. म. चे सचिव श्री अविनाश जाधव तसेच प्राचार्य डॉ एस एम वारकड, उपप्राचार्य डॉ आर आर खेरानी, IQAC प्रमुख डॉ मल्लेश रेड्डी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ राजेंद्र मुद्दमवार उपस्थित होते.
   आजचा तरुण वर्ग हा उद्याचा भावी नागरिक असून त्याने देशाच्या विकासात फार मोठे योगदान दिले पाहिजे त्याचबरोबर आपली जबाबदारी आणि आपले कर्तव्य अतिशय चांगल्या रीतीने पार पाडली पाहिजेत व खऱ्या अर्थाने देशाची राज्यव्यवस्था सांभाळणाऱ्या  लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत बसविले पाहिजे, अशा प्रकारचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी वारकड सर यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मान.श्री संपतजी खलाटे म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश असून या देशात तरुणांची संख्या जास्त आहे, त्यामुळे तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभागी होऊन भारत देशाला सशक्त आणि सुदृढ बनवावे, तसेच ज्यांची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदविणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून भारतातील निवडणुका ह्या निष्पक्ष व निर्भिडपणे पार पडतील. त्यासाठी महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा.
       या कार्यक्रमाचे संचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सदाशिव मुद्दमवार यांनी केले तर आभार प्रा. गुरुदास बल्की यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर वृंद आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने