जाहिरात... Advertisement... विज्ञापन

औरंगाबाद चे संभाजीनगर करणार की नाही? #Chandrapur #Mumbai

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा आघाडी सरकारला सवाल

मुंबई:- स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणाची आहुती दिली. त्या संभाजी महाराजांचे नाव औरंगाबादला शहराला देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत अद्यापही निर्णय घेत नाही हे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. याबाबत खरंच सरकार अनुकूल आहे की नाही असा प्रश्न विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.
छत्रपती संभाजी महाराज यांचा शुक्रवार, ११ मार्चला स्मृतिदिन. यानिमित्त आ. मुनगंटीवार यांनी विधानसभेत विशेष चर्चा उपस्थित केली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याचे वचन जाहीरपणे दिले होते. हे वचन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी पाळावे असे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही शहराच्या नामांतराची प्रक्रिया असते. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता फक्त सरकारने अधिकृत घोषणा करण्याची गरज आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने सरकारने शुक्रवारीच ही घोषणा करावी असा आग्रह त्यांनी धरला.
यासंदर्भात केंद्रीय पातळीवर जर आवश्यकता असेल तर मी स्वतः दिल्लीला येण्यास तयार आहे असे सांगून शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सांसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी तातडीने याचा गांभिर्याने विचार करावा असे म्हणत अन्यथा राज्यातील जनता माफ करणार नाही असा इशारा देखील दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत