Top News

शासकीय योजनेतुन मिळणाऱ्या एक हजार कोंबडीच्या पिल्लांचा मृत्यू #death


पोंभुर्णा:- तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने विविध प्रकारच्या योजना अंमलात आणल्या आहेत.यात शेतकऱ्यांना बैलबंडी,शेतीपयोगी उपकरणे, दुधाळ जनावरे,बकऱ्या गट,कोंबडी पिल्यांचा गट इत्यादी योजना शासनामार्फत राबविण्यात येतात.अशातच पोंभुर्णा तालुक्यातील सतरा लोकांना कोंबडी पिल्ले गट मंजुर झाले. यात एका लाभार्थ्यांना १०० पिल्लांचा गट वाटप करण्यात येणार होते त्यात या योजने अंतर्गत एकुण सतरा लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती.त्यापैकी देवाडा खुर्द,फुटाना, नवेगाव मोरे,चेक नवेगाव आणि घनोटी तुकुम या गावातील सात लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला तर दहा लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले.उर्वरित दहा लाभार्थ्यांसाठी आणलेले एक हजार कोंबडीचे पिल्ले मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे.


जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम राबविण्यात येतो, यात गिरिराज,वनराज,सुवर्णधारा, कडकनाथ,कॅरीगोल्ड,आर.आर., ब्लॉक आस्ट्रॅलार्फ या कोंबड्या स्थानिक पातळीवर गावठी कोंबड्या प्रमाणे आहेत.मास व अंडी उत्पादनासाठी या पक्षांना प्रचंड मागणी आहे.यासाठी एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत एक दिवसाचे कोंबडिचे पिल्ले वाटप हि योजना राबविण्यात येते. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी,भुमिहिन शेतमजूर, अल्पभूधारक, महिला व विकलांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.या सर्व लाभार्थ्यांना या योजनेमुळे दिलासा मिळणार होता, परंतु निवड झालेल्या सतरा पैकी दहा लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणारे एक हजार कोंबडीचे पिल्ले मृत्युमुखी पडल्याने या योजनेतील मंजूर दहा लाभार्थ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे निश्चित झाले आहे.दहा लाभार्थ्यांना मिळणारे एक हजार कोंबडीचे पिल्ले मृत्युमुखी पडले असुन याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


पंचायत समिती येथील पशुधन विस्तार अधिकारी यांच्याकडे हि पिलांची जबाबदारी होती पण त्यांनी या पिल्लांकडे लक्ष देणे सोडाच ते महिन्यातुन फक्त दोनदा आफिस मध्ये येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर मधुन हे कोंबळीचे पिल्ले आणले गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाचा तडाखा वाढत आहे हे पंचायत समिती प्रशासनाला माहीत असने अपेक्षित होते. त्या एक दिवसांच्या पिलांना थंड हवेच्या ठिकाणी ठेवण्यात आले असते आणि त्यांची योग्य काळजी घेतल्या गेली असती तर कदाचित ते पिल्ले उर्वरित लाभार्थ्यांना वाटप करता आले असते. पण नियोजनाचा अभाव आणि विस्तार अधिकारी यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ते कोंबडिचे पिल्ले मृत्युमुखी पडले आहे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
-----------------------------------------------

झालेल्या प्रकारात दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल
धनंजय साळवे
गटविकास अधिकारी पोंभुर्णा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने