लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात #Chamorshi #arrested

Bhairav Diwase
दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
चामोर्शी:- शेतजमिनीची फेरफार नक्कल देण्यासाठी ५ हजारांची मागणी करून २ हजार रुपये प्रत्यक्ष स्वीकारताना एका तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई तालुक्यातील दोटकुली येथे करण्यात आली. नामदेव हरीभाऊ चंदनखेडे (४६ वर्षे) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, भेंडाळाजवळच्या घारगाव येथील युवा शेतकऱ्याला भावाच्या नावे खरेदी केलेल्या शेतजमिनीचे फेरफार करून त्याची नक्कल हवी होती. त्यासाठी त्याने साजा क्र. १२ चे तलाठी नामदेव चंदनखेडे यांच्याकडे अर्ज केला. पण त्यासाठी चंदनखेडे याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील ३००० रुपये त्या शेतकऱ्याने चंदनखेडेला दिले. पण त्यादरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार १० एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. सोमवार दि.११ रोजी नामदेव चंदनखेडे याने ५ हजारांतील उर्वरित २ हजार रुपये एसीबी पथकाच्या समक्ष घेतले. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राकेश ओला (नागपूर परिक्षेत्र) अपर अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक सुरेंद्र गरड, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, हवालदार नथ्थू धोटे, नायक राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, शिपाई विद्या मशाखेत्री, चालक तुळशिराम नवघरे आदींनी केली.