सैनिकी शाळेसंदर्भातील स्‍वप्‍नपुर्तीचा विशेष आनंद:- आ. सुधीर मुनगंटीवार #chandrapur #ballarpur


सैनिकी शाळेचा प्रत्‍येक विद्यार्थी भारतमातेचा गौरव वाढवेल

सैनिकी शाळेच्‍या प्राथमिक विद्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्‍न.
चंद्रपूर:- माझ्या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात देशातील सर्वोत्‍तम अशी सैनिकी शाळा चंद्रपूर जिल्‍हयात मी निर्माण करू शकलो यासाठी मी स्‍वतःला भाग्‍यवान समजतो. यासाठी सैनिकी शाळेच्‍या उभारणीच्‍या प्रक्रियेत निधीची कमतरता भासू दिली नाही. सैनिकी शाळेच्‍या संदर्भात मी एक स्‍वप्‍न पाहीले होते व ते स्‍वप्‍न पुर्णत्‍वास आले याचा मला मनापासून आनंद आहे. गेल्‍या महिन्‍यात मी जेव्‍हा नवी दिल्‍लीला गेलो होतो तेव्‍हा संरक्षण विभागाच्‍या सचिवांची भेट झाली तेव्‍हा देशातील सर्वोत्‍तम सैनिकी शाळा चंद्रपूरची असल्‍याचे ते म्‍हणाले. ही प्रतिक्रिया माझ्यासाठी अभिमानास्‍पद आहेत. या शाळेतुन निघणारा प्रत्‍येक विद्यार्थी भारतमातेचा गौरव वाढविण्‍याचे कार्य करेल असा विश्‍वास विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला. या सैनिकी शाळेमध्‍ये जे विद्यार्थी इयत्‍ता ५ वी मध्‍ये शिक्षण घेत आहेत त्‍यांना ६ वी मध्‍ये प्रवेशाकरिता आरक्षण असावे तसा कोटा निश्‍चीत करण्‍यात यावा यासाठी आपण प्रयत्‍न करणार असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.


दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी सैनिकी शाळा चंद्रपूर येथे प्राथमिक विद्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्‍न झाला. या लोकार्पण सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी प्राचार्य कर्नल डेविड सन्‍स, श्री. देवाशिष, श्रीमती सुनिता यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, जगामध्‍ये १९३ देश आहेत. जे संयुक्‍त राष्‍ट्रसंघाचे सदस्‍य आहेत. १९३ देशांपैकी फक्‍त १४ देशांमध्‍ये वाघ आहे. त्‍या १४ देशांपैकी सर्वात जास्‍त वाघ हे भारतात आहे. भारतातील ७४० जिल्‍हयांपैकी सर्वात जास्‍त वाघ हे चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये आहेत. चंद्रपूर ही वाघांची भूमी आहे. आपण कालच्‍या वृत्‍तपत्रात वाचले असेल की, जगातील सर्वात जास्‍त उष्‍णता ही चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये आहे. सेवा, देशभक्‍ती आणि ज्ञानाची उष्‍णता जगामध्‍ये माझ्या या भूमीमध्‍ये असावी, असे मला नेहमी वाटते. या शाळेमध्‍ये विद्यार्थी पाचवी पर्यंत शिक्षण घेतील. मात्र सहावीमध्‍ये प्रवेश घेण्‍यासाठी या विद्यार्थ्‍यांना कोणतेही आरक्षण नाही. त्‍यामुळे सहावीमध्‍ये प्रवेशाकरीता असणा-या पात्रता परिक्षेची तयारी करुन घ्‍यावी लागेल. त्‍याचबरोबर इयत्‍ता सहावी प्रवेशाकरीता आरक्षण ही मिळवावे लागेल. याकरीता मी संरक्षण मंत्र्यांशी भेटून चर्चा करणार आहे. या सैनिकी शाळेमध्‍ये जे विद्यार्थी पाचवीमध्‍ये शिक्षण घेत आहेत त्‍यांना इयत्‍ता सहावीमध्‍ये प्रवेशाकरीता आरक्षण असावे व तसा कोटा निश्चित केला जावा यादृष्‍टीकोणातून मी प्रयत्‍न करेन.
हा जिल्‍हा कोळसा खाणींचा जिल्‍हा आहे. कोळश्‍याच्‍या खाणीमधून हीरे निघत असतात आणि ते चकाकणारे असतात. मात्र या शाळेतील विद्यार्थी कोहीनूर हि-याच्‍या चकाकीलाही मागे टाकतील असा मला विश्‍वास आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांना सुध्‍दा मी विनंती करणार आहे की, त्‍यांनी त्‍यांच्‍या मुलांमध्‍ये देशभक्‍ती, ज्ञान, कलाकौशल्‍य वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न करावे. भारतीय स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव सुरु आहे. या अमृत महोत्‍सवी वर्षामध्‍ये आपल्‍याला संविधानाने दिलेल्‍या हक्‍कांची तर जाणीव असावीच मात्र कर्तव्‍याची सुध्‍दा जाणीव असली पाहिजे. या परिसरात शिकणार प्रत्‍येक विद्यार्थी आपल्‍या जीवनामध्‍ये यशस्‍वी होईल, जगामध्‍ये त्‍याच्‍या नावाचा गौरव होईल असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. यावेळी प्राचार्य कर्नल डेविड सन्‍स यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाला पालक, नागरिक व विद्यार्थ्‍यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत