Top News

ग्राम पंचायत सदस्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्‍यास एक वर्षाची मुदतवाढ द्यावी:- आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी #chandrapur


जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन सादर
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
पोंभुर्णा:- कोविड १९ च्‍या प्रादुर्भावामुळे राज्‍यातील तसेच चंद्रपूर जिल्‍हयातील ग्राम पंचायत सदस्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्‍यात एक वर्षाची मुदतवाढ देण्‍यात यावी अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाकडे केली आहे. राजुऱ्याचे माजी आमदार श्री सुदर्शन निमकर यांनी या विषयाकडे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले.

दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी वरील मागणीच्‍या अनुषंगाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी जिल्‍हाधिका-यांशी चर्चा करताना आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, महाराष्‍ट्रासह चंद्रपूर जिल्‍हयात ग्राम पंचायतीच्‍या सार्वत्रीक निवडणुका जानेवारी २०२१ च्‍या दरम्‍यान घेण्‍यात आल्‍या होत्‍या. या निवडणुकांचा निकाल दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी घोषीत करण्‍यात आला.
निवडणुका आटोपताच पुन्‍हा कोरोनाची दुसरी लाट राज्‍यात सुरू झाली. त्‍यामुळे शासनाने कोरोनाच्‍या प्रतिबंधाकरिता पुन्‍हा कडक निर्बंध लागू केले. या कडक निर्बंधामुळे शासकीय कार्यालये बंद होती व दळणवळणाची साधने सुध्‍दा लॉकडाऊनमुळे बंद होती. या कालावधीत चंद्रपूर जिल्‍हयात कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे १५६७ व्‍यक्‍ती मरण पावल्‍यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्‍यामुळे ग्राम पंचायत सदस्‍यांना शासकीय कार्यालयातुन जात वैधता प्रमाणपत्राकरिता लागणारे पुरावे वेळेत मिळू न शकल्‍यामुळे एक वर्षाच्‍या मुदतीत ब-याच ग्राम पंचायत सदस्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता आले नाही. तसेच काही ग्राम पंचायत सदस्‍यांनी जात वैधता प्रमाणपत्र उशीरा दाखल केले असता या सदस्‍यांना सुध्‍दा अपात्र करण्‍याबाबतच्‍या नोटीस जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत देण्‍यात आलेल्‍या आहेत.
ग्राम पंचायत सदस्‍यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्‍याकरिता दाखल केलेल्‍या केसेस जात वैधता समितीकडे प्रलंबित असतांना तसेच काही सदस्‍यांनी मुदतीच्‍या नंतर जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले असतांना अशा जवळपास १०४० च्‍या वर ग्राम पंचायत सदस्‍यांना अपात्र करण्‍याबाबतच्‍या नोटीस देण्‍यात आलेल्‍या आहेत. ग्राम पंचायत सदस्‍य हे जनतेमधून निवडून आलेले जनप्रतिनिधी आहे , यात प्रामुख्याने शेतकरी ,शेतमजूर , गरीब नागरिक आहेत .एवढया मोठया प्रमाणात सदस्‍यांना अपात्र केल्‍यास ग्राम पंचायतीच्‍या प्रशासनावर व पर्यायाने ग्रामविकासावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे विशेषतः त्यांच्या हक्कावर गदा येणार आहे.पुन्‍हा सार्वत्रीक निवडणुका घेणे सुध्‍दा प्रशासकीय दृष्‍टया हिताचे ठरणार नाही. त्यामुळे कोविड १९ च्‍या प्रादुर्भावामुळे राज्‍यातील तसेच चंद्रपूर जिल्‍हयातील ग्राम पंचायत सदस्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्‍यात एक वर्षाची मुदतवाढ देणे अत्यंत गरजेचे आहे असेही आ. मुनगंटीवार या चर्चेदरम्यान म्हणाले.
आ. मुनगंटीवार यांच्या भूमिकेशी आपण सहमत असून या बाबत शासनाला अवगत करणार असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले. या संदर्भात ग्रामविकास मंत्री व सचिव ग्रामविकास यांच्याशी देखील आ मुनगंटीवार यांनी चर्चा केली. यावेळी माजी आमदार श्री सुदर्शन निमकर , भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे , रामपाल सिंग , जिल्हा परिषद सभापती रोशनी खान , वनिता आसुटकर , हनुमान काकडे , सरपंच हरिदास झाडे
नामदेव आसुटकर, संजय यादव, केमा भारत रायपुरे, फारुख शेख, श्रीनिवास जगवार, शांताराम चौखे , सुनील बरेकर, मदन चिवंडे , राहुल बिसेन , अमित तांबटकर, महिंद्रा लांबट, रंजना किनाके, लक्ष्मीसागर, लाला रामटेके , सागर गौरकर आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने