रामायणाच्‍या प्रत्‍येक अक्षरात जीवन जगण्‍याचा सार:- आ. सुधीर मुनगंटीवार #chandrapur

Bhairav Diwase

ऊर्जानगरच्‍या उर्वशी भूमकर यांनी गीत रामायण सादर करत जिंकली रसिकांची मने
चंद्रपूर:- गीत रामायण म्‍हणजे केवळ प्रभू श्रीरामचंद्रांचा सांगीतीक जीवनपट नसून व्‍यक्‍तीमत्‍व विकासासंदर्भात आपल्‍या भारतीय संस्‍कृतीने दिलेला दिव्‍य संस्‍कार आहे. अमरावतीच्‍या अंबामातेचा आशिर्वाद घेवून चंद्रपूरच्‍या माता महाकालीच्‍या नगरीत आपल्‍या स्‍वरमाधुर्यातुन गीत रामायण साकारणा-या सौ. उर्वशी भूमकर यांचे हे सादरीकरण चंद्रपूरकरांसाठी चिरस्‍मरणीय ठरेल अशा शुभेच्‍छा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.


दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी चंद्रपूरच्‍या प्रियदर्शिनी नाटयगृहात ऊर्जानगर भूमकर परिवाराच्‍या माध्‍यमातुन आयोजित गीत रामायण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भागवताचार्य मनिष महाराज, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्‍यक्ष डॉ. गोपाल मुंदडा, श्री. मधुसुदन भूमकर, सौ. भाग्‍यश्री भूमकर, सौ. उर्वशी भूमकर व त्‍यांची चमू उपस्थित होती. यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, श्री. मधुसुदन भूमकर आणि सौ. भूमकर या दाम्‍प्‍याने सामाजिक कार्यात नेहमीच सक्रीय योगदान दिले आहे. त्‍यांच्‍या सुनेला प्रोत्‍साहीत करत गीत रामायणाच्‍या माध्‍यमातुन रसिक श्रोत्‍यांना भक्‍तीरसात चिंब भिजविण्‍याचे पवित्र कार्य त्‍यांनी या माध्‍यमातुन आयोजित केल्‍याबद्दल मी त्‍यांचे अभिनंदन करतो असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

ऊर्जानगरची विज इथून ८०० किमीपर्यंत जाते. त्‍याच ऊर्जानगरच्‍या उर्वशीचा गोडवा देखील महाराष्‍ट्रभर पसरावा अशा शुभेच्‍छा त्‍यांनी दिल्‍या. रामायण हा आपल्‍यासाठी केवळ एक पवित्र ग्रंथ नसून जीवन जगण्‍याची पध्‍दत आहे. असा कोणताही धर्म नाही जो रामायणात नाही. राजधर्म, पितृधर्म, पत्‍नीधर्म, मातृधर्म, जनधर्म या सर्वांचा समावेश त्‍यात आहे. रामायणाच्‍या प्रत्‍येक अक्षरात जीवन जगण्‍याचा सार आहे. श्रीराम या शब्‍दात फार मोठे सामर्थ आहे. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांनी अखेरचा श्‍वास राम नामाचा उच्‍चार करत घेतला. दगडावर श्रीराम शब्‍द कोरला तरीही दगड पाण्‍यावर तरंगतो इतकी मोठी शक्‍ती रामायणात आहे, असे भावना विशद करत त्‍यांनी गीत रामायण सादर करणा-या चमुला शुभेच्‍छा दिल्‍या. सौ. उर्वशी भूमकर आणि त्‍यांच्‍या सहका-यांनी अतिशय सुमधुर पध्‍दतीने गीत रामायण सादर करत रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थित होती.