मनीष महाराज यांचे आवाहन
चंद्रपुरात शोभायात्रेत प्रथमच होणार भव्य महिलांचा सहभाग
चंद्रपूर:- श्रीराम नवमी निमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत हिंदू समाजातील बहूसंख्य स्त्रीशक्तीने आपले समाज कूलदैवत, प्रभूश्रीरामाची प्रतिमा व गणवेशात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हिंदू समाजाचा गौरव वाढवावा, असे आवाहन भागवताचार्य श्री मनीष महाराज यांनी केले.
श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने श्रीरामनवमी शोभायात्राबाबत चंद्रपुरातील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनेच्या महिला प्रतिनिधींची सभा गुरुवार, 7 एप्रिल येथील कस्तुरबा मार्गावरील स्वामी नारायण मंदिर येथे आयोजित करण्यात आली. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
यावेळी श्रीराम शोभायात्रा समितीचे कार्याध्यक्ष रोडमल गहलोत उपस्थित होते. मनिष महाराज म्हणाले, धर्म सुरक्षा व परिवार सुरक्षेची सर्वाधिक जबाबदारी ही मातृशक्तीची आहे. महिलांमध्ये संघटन शक्ती अधिक असते. त्यामुळे या शक्तीचा उपयोग करून हिंदू समाजातील महिलांनी एकत्रीत येत प्रत्येक धर्मकार्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. श्रीरामनवमीला प्रत्येक हिंदू परिवाने आपल्या घरी भगवा ध्वज लावावा. तसेच घर परिसर रांगोळीने सुशोभीत करून पाच दिवे लावावे व श्रीरामाचे पूजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच रामनवमीच्या पूर्वसंध्येला 9 एप्रिल रोजी सायंंंकाळी 4 वाजता स्वामी नारायण मंदिर येथून शहरात भव्य दूचाकीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत दूचाकीला भगवा ध्वज लावून जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच रामनवमीनिमित्त डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर आयोजित संस्कार भारती प्रस्तूत गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन 9 एप्रिल रेाजी सायंकाळी 6.30 वाजता सावरकर नगर परिसरातील शासकीय दूध डेअरीजवळील आश्रय येथे करण्यात आले आहे, रामभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभेत करण्यात आले.
सभेचे प्रास्ताविक व संचालन श्रीराम शोभायात्रा समितीचे सहसचिव विजय येंगलवार यांनी केले. सभेला हिंदू समाजातील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनेच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.