Top News

अखेर रेल्वे प्रशासनाने 'त्या' अतिक्रमित घरांवर चालविला बुलडोजर #chandrapur #bhadrawati

विरोध करणा-या तीघांना केले होते स्थानबद्ध

अतिक्रमणधारक ४० वर्षांपासूनचे रहिवासी
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती

भद्रावती:- मागील ४० वर्षांपासून रहिवासी असलेल्या भद्रावती तालुक्यातील माजरी येथील वेकोलि वसाहतीतील रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या १७ घरांवर रेल्वे प्रशासनाने बुलडोझर चालवून अखेर रेल्वे प्रशासनातील मोठा अडथळा दूर केला.
माजरी परिसरातील वेकोलि वसाहतीत रेल्वेच्या जागेवर मागील ४० वर्षांपासून रहिवासी असलेल्या नागरिकांना रेल्वे प्रशासनाने दि.१३ मे पर्यंत घरे खाली करण्याची नोटीस बजावली होती. त्यात पहिल्या टप्प्यात येणाऱ्या १७ अतिक्रमण धारकांचा समावेश होता. परंतु या नोटीसला विरोध दर्शवत स्थानिक लोकप्रतिनिधी व अतिक्रमण धारकांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. माजरीतील व्यापारी संघटना ,माजरी संघर्ष समिती व पीडित नागरिकांनी शनिवारी १४ मे रोजी रेल्वे प्रशासनाविरोधात जन आक्रोश मोर्चा काढून रेल्वे प्रशासनचा निषेध नोंदवला होता. रेल्वे प्रशासनाने घरे पडण्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे रेल्वेच्या कार्यवाही दरम्यान आर.पी.एफ. जवान व नागरिक आमने-सामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
मात्र रेल्वे प्रशासनाने १७ मे रोजी सकाळी ६ वाजता नागरिकांच्या विरोधाला न जुमानता दोन बुलडोझरच्या सहाय्याने अतिक्रमित घरे पाडायला सुरुवात केली. ही कारवाई दुपारी ३ वाजेपर्यंत चालली. कारवाई दरम्यान रेल्वे पोलीस फोर्स, दंगा नियंत्रण पथक, स्थानिक पोलीस दल, वरोरा, भद्रावती येथील पोलिस कुमक बोलावण्यात आली होती.
दरम्यान, घटनेची माहिती होताच माजी जि.प.सदस्य प्रवीण सूर, राजेश रेवते, उल्हास रत्नपारखी यांनी या कारवाईला विरोध केला असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कलम ६८ नुसार रेल्वे प्रशासनाची कारवाई पूर्ण होईपर्यंत स्थानबद्ध करून ठेवले.
यावेळी वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात जवळपास ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात माजरीचे ठाणेदार विनीत घागे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजितसिंग देवरे, बल्लारपूरचे ठाणेदार पाटील, चंद्रपूर नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक किटे, उपनिरीक्षक बेलसरे, भद्रावतीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा आणि इतर पोलिस अधिकारी यांचा समावेश होता. त्यामुळे नागरिकांची उपस्थिती मात्र शून्य होती .यावेळी कोणतेही अतिक्रमणधारक समोरा-समोर आले नाही. विशेष म्हणजे यावेळी परिसरात कलम ३७(१) लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना घटनास्थळी येण्यास मज्जाव करण्यात आला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने