कपडे न धुतल्याच्या रागातून बापनेच गळा आवळून केला १० वर्षाच्या मुलाचा खून #chandrapur

Bhairav Diwase
नागपूर:-कपडे न धुतल्यामुळे चिडलेल्या बापाने दहा वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. ही खळबळजनक घटना आज सोमवारी कोराडीत उघडकीस आली. गुलशन ऊर्फ गबरू संतलाल मडावी (१०, सुरादेवीगाव) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतलाल मडावी हा मूळचा मध्यप्रदेशातील असून तो गेल्या काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात नागपुरात आला होता. त्याला १३ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो पत्नीला रोज मारहाण करायचा. त्यामुळे चार वर्षांपूर्वी पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. तेव्हापासून संतलाल खूप दारू प्यायला लागला. तसेच दोन्ही मुलांना रोज मारहाण करीत होता.
रविवारी सकाळी संतलालने मुलाला कपडे धुण्यास सांगितले होते. मात्र, त्याने खेळण्याच्या नादात कपडे धुतले नाही. त्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या संतलालने मुलगा गबरू याला मारहाण केली. त्यानंतर त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने मुलाचा खून लपविण्यासाठी त्याने मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. त्याच्या गळ्यात दोरी अडकवून घरात लाकडी बल्लीला बांधली. त्यानंतर दुपारी मुलीला घेऊन बाजाराला निघून गेला.
सायंकाळी आठ वाजता तो भावसून आणि भावाला घेऊन घरी आला. त्याने घराचा दरवाजा उघडला असता गबरु गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. संतलालने लगेच त्याला दवाखान्यात नेण्याचे सोंग केले. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र शवविच्छेदन अहवालात गबरूचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.