💻

💻

आणखी किती बळी घेणार? संतप्त शेतकऱ्यांचा वनाधिकाऱ्यांना सवाल #gadchiroli #aarmori


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
आरमोरी:- गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा यासह वाघ हल्ल्यातील विविध मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर रविवारी काढण्यात आला.
आरमोरी बर्डी टी पॉईंटवरून या मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघून वनविभाग कार्यालयावर धडकला. शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघून वनविभाग कार्यालयावर धडकला. आरमोरी वनपरिक्षेत्रात हल्लेखोर वाघाने १३ मे राेजी नलुबाई जांगळे ही महिला आपल्या शेतात काम करीत असताना या नरभक्षक वाघाने तिचा बळी घेतला. तसेच दुसऱ्या दिवशी १४ मे राेजी आरमोरी येथील शेतकरी नंदू गोपाळा मेश्राम या शेतकऱ्याचासुद्धा नरभक्षक वाघाने बळी घेतलेला आहे. शेतकऱ्याला शेतात जाऊन काम करणे अवघड झालेले आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची पेरणी केली असल्यामुळे शेतकऱ्याचे शेतात उभे पीक आहे. अशा परिस्थितीत वाघाच्या भीतीमुळे शेतात न गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी रेटून धरण्यात आली.
यावेळी शेतकऱ्यांनी देसाईगंजचे सहायक वनसंरक्षक धनंजय वायभासे यांना निवेदन दिले. यावेळी तहसीलदार कल्याणकुमार डहाट, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, ठाणेदार मनोज काळबांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम हजर होते.
या मोर्चात भारतीय किसान सघाचे अमोल मारकवार, रयत शेतकरी संघटनेचे दिलीप घोडाम, शेकापचे रामदास जराते, राष्ट्रवादीचे संदीप ठाकूर, वृक्षवल्ली संस्थेचे देवानंद दुमाणे, शिवसेनेचे महेंद्र शेंडे, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, प्रहार संघटनेचे निखील धार्मिक हजर हाेते.
या आहेत निवेदनातील मागण्या
त्या नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदाेबस्त करावा, वाघाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीच्या परीवाराला पन्नास लाख रुपयाची मदत करण्यात यावी, सदर परिवारातील एका व्यक्तीला सरकारी नौकरी देण्यात यावी, ज्या शेतात शेतकऱ्यांवर वाघाचे हल्ले होण्याची शक्यता आहे, अशा शेतकऱ्यांना जमीन न करता वार्षिक एकरी ३० हजार रुपये देण्यात यावे, जंगलालगत शेतीला कुंपण करण्यासाठी तार देण्यात यावे, जंगलातील गावांचे पुनर्वसन करण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
पाच दिवसात वाघ जेरबंद हाेणारच !
 शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाच्या वतीने १०-१० कर्मचाऱ्यांच्या तुकड्या जंगलालगतच्या भागात तैनात केलेल्या आहेत. ह्या कर्मचाऱ्यांच्या तुकड्या सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत राहणार आहेत. सकाळी नऊ वाजल्यांनंतरच शेतकऱ्यांनी शेतात जाऊन सायंकाळी पाच वाजता परत यावे. तसेच या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शार्पशूटरची नऊजणांची टीम आरमोरीत दाखल झाली असून, येत्या चार ते पाच दिवसांत ही टीम वाघाला जेरबंद करण्यात येणार आहे, असे सहायक वनसंरक्षक वायभासे यांनी शिष्टमंडळाला यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत