Top News

पोंभुर्णा शहरातील चौकात गतिरोधक बसवून ट्रॅफिक सिग्नल लावा #chandrapur #pombhurna


वंचित बहुजन आघाडीची निवेदनाद्वारे मागणी
पोंभुर्णा:- शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या विदर्भातील एकमेव दुतर्फा महामार्गावरील वार्ड क्रमांक १मधील संविधान चौक, जनता विद्यालय चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता या ठिकाणी गतीरोधक व ट्रॅफिक सिग्नल लावण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष राजु खोब्रागडे यांनी नगरपंचायत पोंभुर्णा मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता, पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे पोंभुर्णा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पोंभुर्णा महामार्गावरील जळ वाहतूक जोमाने सुरू आहे यात शंकाच नाही याचा सामान्य माणसाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तसेच अपघाताचे प्रमाण वाढले असून काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे यामुळे पोंभुर्णा शहरातील मुख्य रस्त्यावर वार्ड क्रमांक १ संविधान चौक, जनता विद्यालय चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात गतिरोधक बसवून ट्राफिक सिग्नल लावण्यात यावे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात शहरातून वेळवा वरून येणारी वाहतूक,चेक पोंभुर्णा गावाकडून येणारी वाहतूक व सर्विस रोडवरील वाहतुकीने या चौकात वाहतूक नियंत्रण करण्यास त्रासदायक होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आजतागत अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या रस्त्यांच्या दुतर्फा वसाहती झाल्या असून अनेक शाळा, महाविद्यालये, दवाखाने , हॉटेल्स, व्यावसायिक दुकाने मोठ्या प्रमाणात आहे.
दिवसेंदिवस या चौकात वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असून या चौकामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मुख्य रस्त्यावर गतिरोधक व ट्रॅफिक सिग्नल लावण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
जर येत्या आठ दिवसांत हि समस्या सोडवली नाही तर वंचित बहुजन आघाडी याच रस्त्यावर कायमस्वरूपी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा हि निवेदनातून दिला आहे.
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष राजु खोब्रागडे, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष श्यामकांत गेडाम, भारतीय बौद्ध महासभा चे अध्यक्ष अविनाश कुमार वाळके, वंचित बहुजन आघाडी चे विशाल घडसे, सुमित उराडे,पराग उराडे,अजय उराडे, अनिल वाकडे,जलिल गोवर्धन व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने