राजुरा:- नाल्याला आलेल्या पुरातून शेताकडे जाण्याचा प्रयत्न करताना तालुक्यातील नोकारी बु. येथील संजय राजाराम कंडलेवार (वय ५०) हे वाहून गेले. ही घटना रविवारी (ता. १०) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर शोधमोहीम राबविण्यात आली.
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. तर, काही नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील नोकारी बु. (माइन्स) येथील नाल्याच्या पलीकडे संजय कंडलेवार यांची शेती आहे. सकाळच्या सुमारास ते शेतीकडे जाण्यासाठी निघाले. शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यातील नाल्याला पूर आला आहे. पुलावरून पाणी जात असताना ते शेतीकडे जाऊ लागले. यावेळी पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नाल्याच्या दोन्ही बाजूंनी अमलनाला धरणापर्यंत नामदेव देठे, मारोती पिलावान, माजी उपसरपंच वामन तुराणकर, पोलिस पाटील राकेश भगत यांच्यासह गावकऱ्यांनी शोध घेतला.