शब्दांना धार, अन्यायाविरुद्ध प्रहार, जिज्ञासू, कर्तबगार-द ग्रेट सुधीर मुनगंटीवार…… chandrapur

संजय गजपुरे,
भाजपा जिल्हा संघटन महामंत्री,
नागभीड जि. चंद्रपूर
प्रभावी वक्ता , उत्तम आणि अफाट जनसंपर्क, व कुशल प्रशासन, उत्तम नियोजन, आदर्श व्यवस्थापन...
राजकारण हा प्रांतच स्पर्धेचा, दगदगीचा आणि सतत कार्यरत ठेवणारा आहे. अनेक जण वेगवेगळ्या अपेक्षांनी नेत्याकडे पाहत असतात. त्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि त्याचबरोबर कोणालाही नाराज न करण्याची खुप मोठी कसरत करावी लागते. हि कसरत पूर्ण करत असताना राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावर आपली अमिट छाप पाडणारे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, भाजपा प्रदेशाध्यक्ष, अर्थमंत्री-वनमंत्री, लोकलेखा समिती प्रमुख  हा सुधीरभाउंचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरक आहे, रोमांचक, थरारक  आहे. त्यांचे  व्यक्तिमत्त्व विविधांगी आहे. सुधीरभाऊ यांच्याकडे हे कौशल्य अगदी वाखाणण्यासारखे आहे.
 गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी. जनभावनेचा मूड जाणण्यासाठी, लोकसंपर्कासाठी, जनसंपर्क हा प्रत्येक राजकीय नेत्याचा ऑक्सिजन असतो. त्यातून जनतेशी सतत ‘कनेक्ट’ राहणं अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या गतिमान नेत्याच्या राजकारणाचाच अतूट भाग असतो. तेच त्यांचं मुख्य राजकीय भांडवल असतं. त्याच बळावर मुनगंटीवार यांच्यासारखा नेता ‘मास अपील’ मिळवतो. लोकनेता बनतो. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं, त्यांना प्रभावित करणं आणि आपलं भवितव्य निश्चित करणं, ही तळागाळातून वर आलेल्या प्रत्येक लीडरची कार्यशैली असते. म्हणूनच त्यांच्याच जिल्ह्यातील चांदा ते बांदा त्यांचे चाहते आणि प्रशंसक सर्वत्र मोठया संख्येने आढळतात. ज्यांना ‘मास लीडर’ म्हटले जाते, त्या वर्गातले सुधीरभाऊ मुनगंटीवार अग्रगण्य नेते आहेत.
 खरं तर मंत्री म्हणून काम केल्यानंतर फारच कमी नेत्यांकडे सांगण्यासारखं काही असतं. मात्र सुधीरभाऊ येथे अपवाद ठरतात. वनमंत्री म्हणून राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करून रेकॉर्ड ब्रेक काम करून दाखविले . मिललेल्या संधीचं सोनं करायचं आणि त्यातून सर्वसामान्यांसाठी काही तरी मोठं करायचं हाच त्यांचा ध्यास असतो ,आणि त्यांनी ते  सिद्ध देखील करून दाखविले. खुर्चीचा किंवा पदाचा थोडासाही गर्व न बाळगता  त्यांचं सतत काम सुरू असतं आणि आहे.वने आणि वित्त अश्या दोन दमदार कॅबिनेट खाती जवळ असताना हा भला माणुस थोडीशीही अरेरावीची, गर्वाची भाषा वापरात नव्हता. सौजन्यशील आणि अतिशय नम्रता असलेल्या भाषेतून अगदी सामान्य व्यक्तीला ते आपल्या साधेपणाचा परिचय जवळून देतात.
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपल्या वेगळेपणाची छाप जनतेवर उमटवली आहे, अशामोजक्या नेत्यामध्ये आता राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. विदर्भाच्या मंत्र्यांकडे राज्याची धुरा दिल्यानंतर विदर्भ विकासापासून दूर कसा? असा प्रश्न विचारणा-याना सद्या चंद्रपूरचा विकास आरसा झाला आहे. जीव ओतून काम करणा-या या नेत्याने अवघ्या महाराष्ट्राला सद्या “महावनमहोत्सव” या उपक्रमात ५० कोटी “महावृक्षलावगडी”ची लोकचळवळ निर्माण केली आहे. यामाध्यमातून त्यांनी वृक्षलागवडीचा व वृक्षसंर्वधनाचा नवा मंत्र दिला आहे. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, वन व वन्यजीव प्रेमी या वनमहोत्सव मोहिमेत स्वत:ला झोकून देत असून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहवर्धक वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. राज्याच्या राजकारणात अथक परिश्रमाच्या बळावर स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारा नेता, सध्याच्या मंत्रिमंडळातील फार कमी चेहऱ्यांपैकी एक आश्वासक चेहरा अशी ओळख सुधीरभाऊंनी निर्माण केली आहे. आदर्श लोकनेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुधीरभाऊ. मुख्यत्वे सत्ता वाट्याला येण्याचे प्रसंग अपवादात्मक असताना जिद्दीने आणि चिकाटीने पक्षकार्य सुरू ठेवायचे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. परंतु हे आव्हान, मुनगंटीवार यांनी उत्कृष्ट रीतीने पेलली आहे. त्यांच्यामध्ये एक धडपडया कार्यकर्ता,कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारा नेता, प्रेमळ मित्र, वत्सल पिता आणि कुटुंबवत्सल माणूस लपलेला आहे. त्यांच्या निकट संपर्कात आलेल्यांना यात कोणतीही अतिशयोक्ती वाटणार नाही. राज्याच्या सहकार, राजकारण व समाजकारण, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. मुळात “सुधीर” या नावातच एक मोठी ताकद आहे. स्वतःचा जनसंचय हीच मुनगंटीवार यांची  खूप मोठी ताकद आहे.  हात लावील त्याचे सोने करील, अशी कार्यशैली असलेल्या मुनगंटीवारांचा स्पर्श या भागाला विकासाचा ठरावा, अशी अपेक्षा आता महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागली आहे. त्यांना मानणारे व त्यांच्या शब्दासाठी तत्पर असणारे कार्यकर्ते दिवसेंदिवस राज्यभर तयार होत आहेत. सुधीरभाऊ जेथे जातील तेथे राजकारण सोडून माणसे मिळत असल्याचा इतिहास सर्वांसमोर आहे. त्यामुळे जनसंचय करण्यात हातखंडा असलेल्या मुनगंटीवार यांना सर्व जनतेकडून आपलेपणाची हाक मिळत आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक ही त्यांची खासियत आहे.
महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण, अर्थकारण बदलू पाहत आहेत त्यात त्यांचा नक्कीच मोलाचा वाटा असणार आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शेती, कष्टकरी समाज, पाणी अशा ग्रामीण भागातील मूलभूत समस्यांची मुद्देसूद मांडणी करून त्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांनी ध्येयनिष्ठा, तत्वनिष्ठा, साधेपणा जपून जनतेशी बांधिलकी जपली आहे. वृक्षलागवड हि चळवळ व्हावी म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला असून जे जे उत्तम आहे ते समजून घेण्याकडे त्यांचा नेहमीच कल असतो. समोर येणाऱ्या प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, दूरदृष्टी, सर्वांचा विचार व विकास, विकास आणि फक्त विकासाचा ध्यास, प्रेमाचे आभाळ, मायेचा महासागर नेहमीच जमिनीवर असणारा स्वयंसेवक म्हणजे सुधीरभाऊ. मागील ४ वर्षांच्या कार्यकाळात मुनगंटीवार यांनी सुद्धा हेच केलं. त्यामुळेच कि काय फडणवीस सरकार मधील एक कर्तबगार कार्यकर्ता मंत्री अशी छबी जनतेत तयार झालेली दिसून येते. त्यांच्याएवढा गतिमान वित्त नियोजन आणि वनमंत्री आजवर राज्याला लाभला नाही अश्या बोलक्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर आजही दिसतात. स्थानिकांशी उत्तम संवाद साधण्याचं कौशल्य त्यांच्या अंगी ठासून भरलेले आहे. राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना त्यांनी कठोरपणं राबविल्या. त्यांच्या अंमलबजावणीवर त्यांचं बारीक लक्ष असत. आपल्या राज्यभरातील झंझावाती दौऱ्यांतून शासकीय योजनांबद्दलचा थेट ‘फीडबॅक’ त्यांना जनतेतून मिळतो. सुधीरभाऊंचा रुबाबदार पणा, गोरगरिबांना आधार देणं, वेगवेगळे प्रश्न मार्गी लावणं यातच त्यांच वेगळेपण दिसून पडते. सुधीरभाऊंनी लोकांच्या मनावर राज्य केल आहे त्यांच्या वक्तृत्व शैलीने तर सभास्थळी प्रचंड उत्साहाच वातावरण आपोआप निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. दूरदृष्टीचा नेता सतत कार्यमग्न असतो. त्याप्रमाणेच सुधीरभाऊ दिवसरात्र मेहनत घेत असतात. राज्याच्या विकासासाठी त्यांचे चिंतन सुरू असते.पक्षीय भेद बाजूला सारून सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रसंगी दोन पावले मागे येऊन विरोधकांना मदत करण्याबाबतही ते आग्रही असतात. विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या अशा या लोकनेत्याला वाढ दिवसानिमित्त हिरव्यागार शुभेच्छा, त्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे बळ मिळो हीच निसर्गचरणी प्रार्थना.
सुधीरभाउंचा पत्रव्यवहार :- सर्वसामान्य माणसाला मंत्र्यांकडून त्याच्या पत्राला जर उत्तर मिळावे अशी अपेक्षा असते, पण बहुदा ते उत्तर मिळेलच याची शास्वती राहत नाही आणि उत्तर मिळाले तर त्याच्या आनंदाला पारा उरत नाही. समोरच्या व्यक्तीला त्यातून समाधान मिळते, नेमके हेच समाधान महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मिळतेय ते म्हणजे वनमंत्री सुधीर मूनगंटिवार  यांच्याकडून. ते असे कि सुधीरभाऊ स्वत: प्रत्येक पत्राचा जातीने लक्ष्य देवून सबंधित विभागाकडे पाठपुरावा करत असतात. नुसते पत्र देवून मोकळे व्हायचे नाही ते काम पूर्ण झाले कि नाही, नाही झाले तर तर कुठे अडले? का अडले? काय अडचणी होत्या? त्यातील अडचणी, त्रुटी दूर करून तो प्रश्न सुधीरभाऊ निकाली काढतात. दररोज सुधीरभाऊ किमान ७०० पत्रावर स्वाक्षरी करीत असतील. शक्यतो ओरीजनल स्वाक्षरीला जास्त महत्त्व देतात त्याच कारण अस कि भाऊंच्या नजरेखालून सर्व विषय पुढे जातात. एखाद्या पत्रामध्ये निवेदनामध्ये नाविन्यपूर्ण विषय असला तर भाऊ त्याची नोंद स्वत:च्या डायरीमध्ये घेतात. ते स्कॅन स्वाक्षरीचा फार वापर करीत नाही. भाऊंना स्वाक्षरी करायला खूप आवडते ते अगदी मनापासून. जर एखाद्या दिवशी स्वाक्षरी साठी पत्रे आली नाहीत तर त्यांना तो दिवस जड जातो, त्यादिवशी भाऊंच्या जेवणावर निश्चितपणे परिणाम झालेला असेल एवढ प्रेम ते समान्य व्यक्तीला समोर ठेवून करतात. माझा एक मिनिट देखील वाया जावू नये, हा विचार त्यांच्या कायम मनात असतो. त्यांना सतत कामात राहायला आवडते. सुधीरभाऊंच्या  व्यक्तिमत्त्वाची तुलनाच होऊ शकत नाही. माझ्या माहितीनुसार गाडीमध्ये भाऊंच्या गाडीमध्ये एक चिमटा बोर्डवर कोरा कागद असतो त्यावर दोन भाग असतात. एका भागावर कुठली काम करायची नि दुसऱ्या भागावर कुठल्या कामाचा पाठपुरावा करायचा. हि  भाऊंना जेमथेम १९९५ पासून आहे. पत्राचे उत्तर ते सर्वांनाच देतात. सुधीरभाऊ शक्यतो कुठल्याही सामान्य माणसाला दुख:वत नाहीत. कुणीही आले तरी ते त्याला सहज पत्र देतात.
वन विभाग झाले लोकाभिमुख :-आतापर्यंत सामान्य वन विभागाच्या वाटेला जाणे पसंत करत नव्हता मात्र अलीकडच्या काळात सर्वसामान्य माणूस वन विभागाला जोडला गेला आहे तो सुधीरभाऊ मुळे. हरित महाराष्ट्र - नवभारताच्या निर्मितीसाठी त्यांनी 'वन सत्यागृह' सुरु केला. त्यासाठी त्यांनी ५० कोटी महावृक्षलागवड योजना हाती घेवून लोकचळवळ निर्माण केली. वृक्षलागवड योजनेकडे केवळ उपक्रम म्हणून बघितले जायचे मात्र सुधीरभाऊंनी त्याला लोक चळवळीत रुपांतर केले. शेवटच्या आणि तळागाळातील सर्वसामान्य माणूस या मोहिमेत स्वयंस्फुर्तीने सहभागी झाला. वन विभागात आपले म्हणणे कोण एकूण घेणार अशीच परिस्थिती आधी होती मात्र  सुधीरभाऊंनी १९२६ 'हेलो फोरेस्ट' टोल फ्री २४ तास संकल्पना अमलात आणली. त्यामुळे या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी येवू लागल्या त्याचा रिझल्ट तात्काळ मिळणे सुरु झाला,  अशी हेल्पलाईन सुरु करणार महाराष्ट्र हे देशातील पहिलच राज्य आहे. देशाच्या सीमेच संरक्षण करण्यासाठी जशी सेना असते, त्याच धर्तीवर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक कोटी नागरिकांची ग्रीन आर्मी अर्थात हरित सेना असावी या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. स्वयंसेवक पातळीवर हे सैनिक पर्यावरणाच रक्षण करतील. याशिवाय बांबू मोहाला वाहतूक परवान्यात सूट दिली. चांडा ते बांदा उपक्रम सुरु केलेत, डॉ. शामाप्रसाद जनवन योजना राबवून वनाशेजारील गावातील लोकांसाठी १०० टक्के कुटुंबांना गैस सिलेंडर वाटप योजना राबविली , बुरड समाजातील बांबू कारागिरांना स्वामित्व शुल्कात सूट दिली, नगर वन उद्यान हि केंद्र पुरस्कृत योजना सुरु केली, कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना सुरु केली वन्यप्राण्यांमुळे मानवहानी प्रकरणी वाढीव अर्थ सहाय्य देणे, पशुधन व पिकनुकसान भरपाईमध्ये मिळणारे अर्थसहाय्यमध्ये वाढ केले.
मिस कॉल आणि मेसेजला मिळतो प्रतिसाद:- सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा मंत्र्यांना फोन करतो तेव्हा त्याला अपेक्षित असते कि त्या मंत्र्यांनी दोन शब्द आपल्या सोबत बोलणे मात्र त्या व्यक्तीचा अपेक्षाभंग झाल्याशिवाय राहत नाही, कारण अनेकदा आमदार, खासदार, मंत्र्यांकडून फोनला प्रतिसाद मिळत नसतो. सामान्य व्यक्तीच्या आलेल्या मिस कॉलला देखील सुधीरभाउंचा प्रतिसाद मिळतो. दिवसभर मिटिंग आणि कार्यक्रम संपले कि भाऊ सुटलेले कॉल घेणे सुरु करतात. त्यांची रिप्लाय देण्याची पद्धत आगळी-वेगळी आहे. हेलो... मी सुधीर मुनगंटीवार बोलतोय, आपण मला कॉल केला होता, बोला काय म्हणणे आहे आपले!!! असाच त्यांचा रिप्लाय असतो. एवढच नव्हे तर एखाद्याने मेसेज केला असेल तर त्याला भाऊ वेळेनुसार उशिरा का होईना रिप्लाय देतात. एखादा महत्त्वपूर्ण मेसेज असेल तर त्याची प्रिंट आउट काढून नोंद घेतात. मिस कॉलला प्रतिसाद देणारे सुधीरभाऊ मुनगंटीवार हे एकमेव मंत्री  असावेत अस माझ मत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत