Top News

....मग तुम्ही मोदींचा फोटो का वापरला? आ. सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल #chandrapur


मुंबई:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इतरांना म्हणतात की, माझ्या वडिलांचा फोटो न वापरता निवडून या. पण मग पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुमचे वडील नव्हते. मग तुम्ही 2019 च्या निवडणुकीवेळी वरळी मतदारसंघातील बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांचा फोटो का वापरला, असा सवाल भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या पहिल्या मुलाखतीचा पहिला भाग आज (मंगळवार) प्रसिद्ध झाला. यामध्ये त्यांनी शिंदे गट व भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर या टीकेला आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, विरोधी पक्ष संवेदनशील आणि सुसंस्कृत असावा. ते इतरांना गद्दार म्हणतात. मग 24 ऑक्टोबर 2019 ला तुम्ही काय केले? तुम्ही विधानसभेत असंसदीय शब्द वापरता, आम्ही विरोधकांच्या उरावर बसू, असे म्हणता.
आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षात आहेत, त्यांच्याकडून आम्हाला संवेदनशील आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे असेही म्हणाले की, सुडाचे राजकारण नको. पण  नितेश राणे, नारायण राणे यांच्यावरील कारवाई, देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस आणि हनुमान चालीसा म्हणून पाहणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना 14 दिवस जेलमध्ये टाकून तुम्ही काय केलेत, असा सवाल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
मागील 60 वर्षामध्ये मुख्यमंत्री काम करायचे, त्यांची बातमी होत नव्हती. आईने मुलासाठी स्वयंपाक केला, तर त्यामध्ये बातमी करण्यासारखे काहीच नसते. मात्र, 60 वर्षामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री मंत्रालयात गेल्याची बातमी झाली, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने