जादूटोणा केल्याच्या संशयावरून विधवा महिलेला बेदम मारहाण Beating

दोन आरोपींना अटक
चिमूर:-:जादूटोणा केल्याच्या संशयातून चंद्रपूर जिल्ह्यात एका विधवा महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर महाराष्ट्र नरबळी व अंधश्रद्धा विरोधी कायद्याअंतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केले आहे.
 
 अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या वाघेडा येथे ही संतापजनक घटना घडली आहे. देवानंद मेश्राम (27) आणि भैयाजी मेश्राम (60) अशी आरोपींची नावे आहेत.
चिमूर तालुक्यातल्या महादवाडी-वाघेडा येथे आरोपी आणि पीडित महिला यांचे शेजारी शेजारीच शेत आहे. आरोपीची पत्नी सतत आजारी असते. याबाबत आरोपीने एका मांत्रिकाकडे विचारणा केली असता त्याने विधवा महिलेने जादूटोणा केल्याचे सांगितले. यावरुन देवानंद मेश्राम आणि भैयाजी मेश्राम यांनी विधवा शेतकरी महिलेला जादूटोण्याच्या संशयावरून बेदम मारहाण केली. याशिवाय विधवा महिलेच्या पुतणीला देखील बेदम मारहाण करण्यात आली.
 यानंतर पीडित महिलेने चिमूर पोलीस ठाणे गाठत घडला प्रकार पोलिसांना सांगितला. पीडितेच्या तक्रारीवरून चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर महाराष्ट्र नरबळी व अंधश्रद्धा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींना अटक करुन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, चिमूर पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत