गडचिरोली:- पंधरवड्यापूर्वी प्रेमप्रकरणातून एका युवकाची हत्या केल्याप्रकरणी मालेवाडा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. सोनू कोल्हे, भाकराय कोल्हे व एकनाथ उसेंडी अशी अटकेतील आरोपींची नावे असून, ते आरमोरी तालुक्यातील तुलतुली येथील रहिवासी आहेत.
आरमोरी तालुक्यातील कोसरी येथील समीर आहा या २२ वर्षीय युवकाचा मृतदेह २३ जुलै रोजी तुलतुली ग्रामपंचायतीच्या तलावात आढळून आला होता. त्यासंदर्भात पुराडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु समीरचा मृत्यू संशयास्पद असल्याने मालेवाडा पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांनी तपास सुरु केला. त्यावेळी त्याची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे तपासात लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तुलतुली येथील सोनू कोल्हे, भाकराय कोल्हे व एकनाथ उसेंडी यांना १० ऑगस्टला अटक केली.
समीर आहाचे तुलतुली येथील एका युवतीशी प्रेमसंबंध होते. १६ जुलैच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तो तुलतुली येथे आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. समीरला बघताच त्याच्या प्रेयसीची बहीण ओरडली. त्यानंतर सोनू कोल्हे, भाकराय कोल्हे व एकनाथ उसेंडी यांनी त्याला घरासमोरच काठीने बेदम मारहाण केली. यात तो बेशुद्ध झाला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला त्याच्याच मोटारसायकलवरुन गावाबाहेर नेऊन रस्त्याच्या कडेला फेकून दिले. तिघेही झुडूपात लपून बघत होते. काही वेळाने समीर हा कसाबसा उठून चालत असताना तिघांनी त्याला पकडून गावाजवळच्या तलावात फेकले. यातच त्याचा मृत्यू झाला, असे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे तिघांनाही अटक करण्यात आली.
मालेवाडा पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक एन. बी. राठोड यांच्या नेतृत्वात हवालदार दुगा, शिपाई ठाकरे, संतोष हुंद्रा, उमेश जगदाळे, राजू मडावी यांनी घटनेचा तपास केला.