💻

💻

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात जीवन गौरव, कर्मवीर पुरस्कारांसह विविध स्पर्धा पुरस्कारांचे वितरण सोहळा संपन्न #chandrapur


डिजिटल मीडियासाठी दिला जाणार पुरस्कार प्रकाश हांडे आणि विजय सिद्धावार यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान
चंद्रपूर:- सोमवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात जीवनगौरव, कर्मवीर पुरस्कारांसह विविध स्पर्धा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुधीर मुनगंटीवार, मुख्य मार्गदर्शक राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे उपस्थित होते.
याप्रसंगी सुनील देशपांडे यांना जीवनगौरव तर बाळ हुनगुंद, यशवंत मुल्लेमवार यांना कर्मवीर पुरस्कार प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख राशी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तर शिक्षण महर्षी तथा माजी आमदार स्व. श्रीहरी बळीराम जीवतोडे स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ग्रामीण वार्ता पुरस्कार विकास खोब्रागडे, गणेश लोंढे, प्रशांत डांगे, दैनिक ''पुण्य नगरी''चे अमर बुद्धारपवार, राजकुमार चुनारकर यांना, स्व. सूरजमल राधाकिसन चांडक स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा मानवी स्वारस्य अभिरूची कथा पुरस्कर साईनाथ कुचनकर, स्व. छगनलाल खजांची स्मृती शुभवार्ता पुरस्कर साईनाथ सोनटक्के, इतिहास अभ्यासक अशोकसिंग ठाकूर वृत्तछायाचित्र पुरस्कार प्रियंका पुनवटकर, स्व. सुशीला राजेंद्र दीक्षित स्मृतिप्रित्यर्थ उत्कृष्ट टीव्ही वृत्तांकन पुरस्कार अन्वर शेख, डिजिटल मीडियासाठी दिला जाणार पुरस्कार प्रकाश हांडे आणि विजय सिद्धावार यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धा पुरस्कारांचे प्रायोजक, परीक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, काही वर्षांपूर्वी वृत्तपत्रातील बातमी विधानसभेत तारांकित प्रश्नाचा विषय होत होता. मात्र, आता वृत्तपत्राच्या बातमीवरून तारांकित प्रश्न मांडल्यास ''हे खरे नाही'' उत्तर मिळते. वृत्तपत्रांच्या बातमीवर तारांकित प्रश्नच मांडू नये आदेशच मिळत त्यामुळे भविष्यात वृत्तापत्राची विश्वसनीयता कायम ठेवण्यासाठी पत्रकारांना काम करावे लागणार आहे. पत्रकारांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न असो की आरोग्याचा प्रश्न असो आगामी काळात हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्यमाहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, पत्रकारांच्या समोर आज अनेक आव्हाने आणि समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी पत्रकारांना संघटितपणे भूमिका घ्यावी लागणार आहे. पत्रकार हा सर्वात शोषित आणि पीडित असा घटक आहे. मात्र, याच पत्रकारावर सर्वबाजूने टीका होताना दिसतेय.टीका करणाऱ्यांनी पत्रकार कोणत्या परिस्थिती काम करतोय हे समजून घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी सत्कारमूर्ती सुनील देशपांडे, बाळ हुनगुंद, यशवंत मुल्लेमवार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक मजहर अली, संचालन प्रशांत विघ्नेश्वर तर आभार बाळू रामटेके यांनी मानले. यावेळी जीवनगौरव सन्मानपत्राचे वाचन डॉ पंकज मोहरीर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत