Top News

'त्या' वस्तीगृह अधीक्षकाला २ दिवसांची पोलीस कोठडी #chandrapur


बरांज-तांडा येथील अत्याचार प्रकरण
भद्रावती:- येथून जवळच असलेल्या बरांज-तांडा येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम वस्तीगृह अधीक्षकास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती तालुक्यातील बरांज-तांडा येथे घमाबाई माध्यमिक आश्रमशाळा आहे. ही निवासी आश्रमशाळा असल्याने मुले-मुली शाळेतच राहतात. दरम्यान, एक महिन्यापूर्वी इयत्ता आठवीत प्रवेश घेतलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर याच आश्रमशाळेतील वस्तीगृह अधीक्षकाने चार वेळा अत्याचार केला.
तसेच ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पिडीत मुलीने कोणालाही घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले नाही. परंतु काही दिवसांतच मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्या कुटुंबीयांनी तीला हिंगणघाट येथे आपल्या घरी नेले. तेथे ती उदास व एकांतात राहायची. याबाबत तिच्या कुटुंबीयांनी आणि शेजा-यांनी विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता तीने शाळेच्या अधीक्षकाने आपल्या सोबत कुकर्म केल्याचे सांगितले.
याप्रकरणाची पिडीत मुलीच्या पालकाने हिंगणघाट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार हिंगणघाट पोलिसांनी आरोपी अधीक्षकाविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७६ व पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करुन दि.७ ऑगस्ट रोजी अटक केली. परंतु अत्याचाराची घटना भद्रावती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सदर प्रकरण हिंगणघाट पोलिसांनी भद्रावती पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानुसार भद्रावती पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेऊन वरोरा येथील सत्र न्यायालयात आज दि.८ ऑगस्ट रोजी हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
    दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक तांदुळकर आणि नेहा साळुंखे यांचे विशेष तपास पथक गठीत करुन तपास सुरू केला आहे. पिडीत मुलगी ही काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नसून सध्या ती नागपूर येथे उपचार घेत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने