चालकाची प्रकृती बिघडल्याने पुलगाव आगाराची धावती बस चढली दुभाजकावर #accident #bus #chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- प्रवासी घेऊन चंद्रपूरच्या दिशेने निघालेल्या पुलगाव आगाराच्या बसच्या चालकाची धावत्या बसमध्ये अचानक प्रकृती बिघडली. अशातच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट दुभाजकावर चढले. ही घटना चंद्रपूर मार्गावरील आरंभा टोल जवळ सोमवारी घडली असून बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. पण बसचे मोठे नुकसान झाले आहे.
रापमच्या पुलगाव आगारात दिनकर शंकर जामणेकर (५०) हे चालक म्हणून कार्यरत आहेत. ते सोमवारी एम. एच. ४० ए. क्यू. ६२३६ क्रमांकाची बस घेऊन पुलगावच्या बस स्थानकावर पोहोचले. ते याच बसमध्ये प्रवासी घेऊन चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. भरधाव बस नागपूर-चंद्रपूर मार्गावरील आरंभा टोल नाक्याजवळ आली असता दिनकर यांची प्रकृती अचानक बिघडली. ते स्वत:सह बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असतानाच वाहन थेट रस्ता दुभाजकावर चढले. चालकाची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच वाहक आशीष धांदे यांनी वरिष्ठांना माहिती देत दिनकर यांना रुग्णालयात नेण्यासाठी धडपड केली. रुग्णवाहिकेच्या सहाय्याने दिनकर यांना तातडीने समुद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत