आज गोंडवाना विद्यापीठाची निवडणूक


चंद्रपूर:- रविवार, 4 सप्टेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुका होत आहेत. मावळत्या सिनेटची मुदत ऑगस्टच्या 31 तारखेला संपली आहे. त्यानंतर लगेच निवडणुका घेणारे गोंडवाना विद्यापीठ हे अख्ख्या महाराष्ट्रात पहिले ठरत आहे, हे विशेष. या निवडणुकीत व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापक गटातील आणि विद्यापरिषदेसाठी निवडणूक होत असली, तरी खरी रंगत पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीने आणली आहे. त्यातल्या त्यात अभाविप व शिक्षण मंचच्या उमेदवारांनी या गटातून आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 अन्वये होऊ घातलेल्या प्राचार्य, शिक्षक व पदवीधर अशा तीन गटातून एकूण 33 जागांसाठी 88 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शिक्षक मतदार संघातून 10 प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी 42 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर पदवीधर मतदार संघातूनही 10 जण निवडूण द्यायचे आहेत. त्यासाठी 31 उमदेवार रिंगणात आहेत. या दोन्ही गटातून खुल्या प्रवर्गातील 5 उमेदवार आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व महिला यातून प्रत्येकी एक उमेदवार निवडायचे आहेत.
विद्यापरिषदेमधून विज्ञान व तंत्रज्ञान, मानवविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन, आंतरविद्याशाखा यातून प्रत्येकी दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत. आंतरविद्याशाखेसाठी सर्वच उमेदवारी अर्ज अपात्र ठरलेत. उर्वरित तीन शाखामधील राखीव गटातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर खुल्या गटातून विज्ञान व तंत्रज्ञानमधून 3, मानवविद्या शाखेतून 4, वाणिज्य व व्यवस्थापनमधून 2 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 54 मतदान केंद्रांच्या केंद्रनिहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून, त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
7 आणि 8 सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुका सुरळीत पार पाडल्या जाव्यात यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. जेणेकरून कर्मचार्‍यांना कुठल्याही अडचण निर्माण होणार नाही. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकरे आणि कुलसचिव तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी डॉ. अनिल हिरेखन यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाचे कर्मचारी निवडणुकीच्या आयोजनासाठी सज्ज झाले आहेत.
पदवीधर गटात अभाविप व मंचची आघाडी

गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर गटातील निवडणुकीत सर्वाधिक नोंदणी करण्यापासून तर प्रचार आणि नियोजनाच्या बाबतीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिक्षण मंचच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसते. अभाविपकडून खुल्या प्रवर्गातील प्रशांत दोंतुलवार, यश बांगडे, स्वरूप तारगे, सागर वझे, तर राखीव प्रवर्गातून एसटीच्या योगिता पेंदाम, व्हिजे-एनटीचे गुरूदास कामडी, एससीचे जयंत गौरकार, ओबीसीचे धमेंद्र मुनघाटे आणि महिला राखीव गटाच्या किरण गजपुरे रिंगणात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत