चंद्रपूर:- काल शुक्रवार दि. 2 सप्टेंबरला जिल्हा परिषद शाळेत, घुगुस काँग्रेसतर्फे गाजावाजा करत अमराई येथील भूस्खलनग्रस्त कुटुंबीयांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. या धान्यकीट जीवघेणं असल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दुपारची वेळ देऊन रात्री उशिरापर्यंत धान्यकिटचे वाटप करण्यात आले.
सकाळी मिळालेल्या धान्यकीट काही कुटुंबीयांनी उघडून बघतात त्यांना धक्का पोहोचला. धान्यकीट मधून उंदीर उड्या मारून पळू लागले, किटमधुन दुर्गंधी येऊ लागली. तांदळाचे पाकीट तर पूर्णतः सडून अळ्या लागून खराब झाले आहे. बेसन बुरशी लागून पिवळ्या मातीसारखे दिसत आहे. गव्हाच्या पिठात अड्या पडल्या आहेत. दाळ भिरूड पडून कुजून गेलेली आहे. दिलेल्या इतर सर्व वस्तू खराब होऊन त्यातून दुर्गंधी येत आहे.
ही बाब लक्षात येताच नागरिकांनी संताप व्यक्त केला. अगोदरच आम्ही संकटात आहोत, त्यातच अशा निकृष्ट धान्य किट देऊन आम्हा गरीबांची थट्टा चालवली आहे. हा आमच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार आहे. कीटच्या आतून उंदीर उड्या मारून पडत आहेत, अड्या, सोंडे निघत आहेत. अन्न खाऊन आम्ही व आमची लहान मुले बिमार पडतील एखाद्याचा जीव गेला तर जबाबदार कोण राहील? असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.