Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

वाघाच्या तावडीतून मुलाने केली वडिलांची सुटका

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- ताडोबा अभयारण्याबाहेर वाघांच्या मुक्त संचाराने मानव आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष वाढल्याचे चित्र आहे. यातूनच जंगलात तर कधी जंगलाबाहेर शेतकरी, शेतमजुरांचे बळी जात आहेत. अशातच एक थरारक घटना समोर आली आहे. जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका 65 वर्षीय शेतकर्‍यावर वाघाने हल्ला केला. परंतु बापाला वाचवण्यासाठी धावून जात पोटच्या मुलाने काठी हाणल्याने वाघाने धूम ठोकल्याने वडिलाचे जीव वाचले. हा थरार मंगळवारी दुपारच्या सुमारास चिमूर तालुक्यातील सातारा शेतशिवारात पाहायला मिळाला. श्रीकृष्ण असे धाडसी मुलाचे नाव असून गोविंदा चौखे असे वडिलांचे नाव आहे.
ताडोबा अभयारण्याच्या बफरझोनलगत सातारा हे छोटेसे गाव वसले आहे. सातार्‍यापासून अर्धा किमी अंतरावर बफरझोनलगत चोखे यांचे शेत आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ते मुलगा श्रीकृष्ण सोबत जनावरे चारायला गेले होते. त्यांच्या शेताला लागूनच ताडोबा बफरझोन आहे. याचवेळी जंगलालगत वाघ दडून बसला होता. दुपारी दोनच्या सुमारास वाघाने थेट गोविंदा यांच्यावर हल्ला केला. हल्ला होताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. वडिलांपासून काही अंतरावर असलेल्या श्रीकृष्णने वडिलांच्या ओरडण्याचा आवाज येताच त्याने थेट काठी वाघावर हाणली. काठीच्या वार आणि आरडाओरड झाल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत