गणेश भक्तांची तीव्र नाराजी(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- नगरपरिषद गडचांदूरच्या गांधी चौकातील उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावातील निर्माल्य व विसर्जित मूर्त्याची माती व पाणी रस्त्यावर पायदळी तुडविल्या गेल्याने विसर्जनाच्या दिवशी अनेक गणेश भक्तांनी तीव्र रोष व्यक्त केला व नगरसेवकांना बोलावून खडे बोल सुद्धा सुनावले.
गांधी चौकात उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलाव व निर्माल्य कुंडातील साहित्य सर्व मंडळांचे विसर्जन मिरवणूक निघाली असताना रात्रौ 8 ते 9 दरम्यान भर रस्त्यावर सोडण्यात आले. सदर प्रकरणाची माहिती होताच अष्टविनायक गणेश मंडळाच्या सदस्यांनी नगरपरिषद च्या बेजबाबदार कार्य प्रणाली बद्दल तीव्र रोष व्यक्त केला. या गणेश मंडळांच्या पुढाकाराने काही नागरिकांनी या तलावात घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन केले होते. त्या नागरिकांनीही या मंडळाच्या सदस्यांना धारेवर धरले. त्यामुळे अष्टविनायक गणेश मंडळाचे सतीश बिडकर, उद्धव पुरी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी त्वरित सदर जागेवर बांबू व दोरी बांधून निर्माल्य पायदळी तुडविल्या जाणार नाही यासाठी प्रयत्न केले.
नगरसेविका मीनाक्षी एकरे यांनाही तात्काळ घटनास्थळी पाहणी करून नगरपरिषद च्या संबंधितांना बोलून सर्व निर्माल्य व पाणी कुंडात जमा करण्याच्या सूचना दिल्या. रात्रौ 10 च्या सुमारास न प कर्मचाऱ्यांनी पुन्हा सर्व माती व निर्माल्य जमा करून प्रकरण अंगावर शेकू नये या करिता झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या चुकीने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागून निःश्वास सोडला असला तरी मात्र परिसरातील या पुढे न प तर्फे उभारण्यात येणाऱ्या कुंडात श्री. गणेश मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सदर प्रकरणाचा त्या दिवशीच उहापोह झाला असता तर मोठ्या प्रमाणात तणाव वाढला असता म्हणून अष्टविनायक गणेश मंडळांच्या काही प्रमुख सदस्यांनी आपली मूर्ती महात्मा गांधी शाळेच्या बाजूला उभी करून गांधी चौक गाठले होते. शांतता अबाधित राहावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या मंडळाचे पदाधिकारी गणेश मूर्ती सोबत काही वेळ ट्रॅक्टर जवळ हजर नव्हते, परंतु त्यात पोलीस प्रशासनाचा काही गैर समज झाल्याने गणेश भक्तांना पोलिसांच्या वतीने सुद्धा "प्रसाद" मिळालाच. हे सर्व घडले ते नगरपरिषद च्या बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यामुळे एकंदरीत गणेश मंडळाने स्वतः साफ सफाई करून प्रकरण हाताबाहेर जाऊ दिले नसले, तरी गणेश भक्तांची मात्र तीव्र नाराजी ओढवली आहे.