प्राध्यापक पतीने पत्नीला फासावर लटकवले, पण दोर तुटल्याने वाचला जीव #chandrapur #Rajura

Bhairav Diwase

राजुरा:- नशिबाची साथ असली तर माणूस असाध्य गोष्टही साध्य करू शकतो, नशिबाची साथ असली तर मृत्यूही हरतो आणि आपण जिंकतो, याची प्रचिती राजुरा येथील एका घटनेने आली.
राजु-यातील प्राध्यापक मंगेश कुळमेथे याने पैशासाठी चक्क आपल्या पत्नीला फासावर लटकवले. मात्र, पत्नीचे नशीब बलवत्तर होते म्हणूनच की काय फासाचा दोर तुटला आणि ती बचावली. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक कुळमेथे याचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले. सुरुवातीला कुटुंब एकत्र होते मात्र काही दिवसांनी सासू, सासरे व दीर जवळच वेगळे राहू लागले. अवघ्या चार महिन्यातच कुळमेथेने पत्नीकडे पैशासाठी तगादा लावला.
एकदा पत्नीने माहेरून दोन लाख रुपये आणूनही दिले, मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने जास्त पैसे देणे वडिलांना शक्य नव्हते. १४ सप्टेंबर रोजी माहेरून पैसे आणण्यासाठी पती-पत्नीमध्ये वाद झाला. दरम्यान, शेजारीच राहणारे सासरे व दीर घरी आलेत, त्यांनी पीडितेला दमदाटी करून पैसे आणण्यास सांगितले. त्याच रात्री जवळपास एक वाजताच्या सुमारास मंगेशने दारूच्या नशेत पुन्हा पत्नीशी वाद घातला. त्याने वडील व लहान भवास बोलावून घेतले. वाद विकोपाला गेल्याने पती मंगेश, सासरे व दीर ह्यांनी पंख्याला दोरी बांधून पीडितेला पलंगावर खुर्ची ठेऊन त्यावर उभे करून फासावर लटकवले. यानंतर ते समोरच्या खोलीत जाऊन बसले.
मात्र, नशीब बलवत्तर असल्याने पंख्याला अडकलेली दोरी तुटली आणि महिला मृत्यूच्या दारेतून परतली.या घटनेमुळे भेदरलेल्या महिलेने मागच्या दाराने घराबाहेर पळ काढला व पहाटेपर्यंत राजुरा बस स्थानकावर लपून बसली. सकाळ झाल्यानंतर ती माहेरी गेली. आपली प्रकृती ठीक नसल्याचे कारण तिने आई-वडिलांना सांगितले. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणीसाठी चंद्रपूर येथे गेली असता तिने बहिणीला आपबिती सांगितली. अखेरीस रविवारी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.