Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

वर्षभरात नऊ शेळ्या फस्त करणारा अजगर पकडला #chandrapur #bramhapuri

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
ब्रम्हपुरी:- ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली गावात गेल्या वर्षभरापासून अजगराची दहशत होती. या अजगराने एक-एक करत गावातील तब्बल नऊ बकऱ्या फस्त केल्या. या बारा फुटी अजगराला पकडण्यात अखेर यश आले आहे.
उचली गावाशेजारील शेतशिवारात अजगरचा वावर असल्याने गावकरी शेतात जायला घाबरायचे. लहान मुलांना लगतच्या भागात जाण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. शनिवारी मीनाक्षी ढोंगे यांची बकरी अजगराने गिळली. याबाबतची माहिती अर्थ कंझर्व्हेशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मनोज वठे यांना देण्यात आली.
माहिती मिळताच सर्पमित्र ललित उरकुडे, विवेक राखडे, चेतन राखडे व ईशान वठे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. मात्र, अंधार व नाल्याची बाजू असल्याने अजगराला पकडण्यात अडचण येत होती. तरीसुद्धा मोठ्या शिताफीने अजगरास पकडण्यात आले. यानंतर गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला व संस्थेच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
हा अजगर बारा फूट लांबीचा आहे. या आकाराचा अजगर ब्रम्हपुरी भागात आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. अजगराला वनपरिक्षेत्र अधिकारी सेमस्कर, वनरक्षक संभाजी बळदे यांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे गुप्त स्थळी सोडून देण्यात आले. या बचाव कार्यात क्रिष्णा धोटे व गावाचे पोलीस पाटील संघर्ष जगझापे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत