पवनी:- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत डोक्याला दगडी वरवंट्याने ठेचून जिवे मारल्याची घटना पवनी तालुक्यातील पिंपळगाव/निपानी येथे शुक्रवारी रात्री घडली.
अर्चना अरविंद रामटेके (40) असे मृत पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती अरविंद माधव रामटेके (43) याला पवनी पोलिसांनी रात्रीच तब्यात घेतले.
पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपानी येथील रहिवासी अरविंद रामटेके यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदोली येथील अर्चना हिच्याशी लग्न झाला होता. दोन वर्षापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांचे नेहमीच वाद व्हायचे. शुक्रवार 7 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रसंगी वाद विकोपाला जावून अरविंदने घराचा दरवाजा बंद केला व पत्नीच्या डोक्यात वरवंट्याने वार केले. किंचाळ्या ऐकून शेजा-यांनी धाव घेतली असता अर्चना रक्ताच्या थारोळ्यात दिसली. यावेळी तिला तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यास सांगितले. येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सदर प्रकरणाची माहिती होताच अड्याळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले व अरविंद रामटेके याला ताब्यात घेतले. मुलगा भावीक रामटेके याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अरविंद विरूध्द गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक हरिशचंद्र इंगोले, हवालदार भुमेश्वर शिंगाडे करीत आहेत.