सिरोंचा:- मानव विकास अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सिरोंचा येथून बामणी गावाकडे निघालेली एसटी महामंडळाची बस रस्त्यावरील खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात लगतच्या शेतात घुसली. यावेळी बसमध्ये प्रवासी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही.
हा अपघात शनिवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास घडला. यासंदर्भात अहेरीचे आगार व्यवस्थापक युवराज राठोड यांनी माहिती दिली कि, त्या बसच्या स्टिअरिंगचा नट ढीला झाल्यामुळे खड्डा वाचविताना बस अनियंत्रित झाली आणि शेतात घुसल्याचे चालकाने सांगितले. तांत्रिक बाबी तपासण्यासाठी टीमला पाठविले आहे.
या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे बसेसमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढल्याचे राठोड म्हणाले. अपघातग्रस्त बसमध्ये चालक व्ही.डी. गेडाम व वाहक सूर्यकांत मोरे होते.