Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

माता महाकाली मंदीर परिसराचा विद्युतीकरणासह विकासकामांच्‍या निविदेला शासनाची मंजूरी #chandrapur


६० कोटी रू. किंमतीच्‍या विकास प्रकल्‍पाला लवकरच सुरूवात होणार

पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित
चंद्रपूर:- चंद्रपूरचे आराध्‍य दैवत माता महाकाली मंदीराशी संबंधित विद्युतीकरणासह विकासकामांच्‍या निविदेला शासनाची मंजूरी मिळाली असून पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप ६० कोटी रु. किमतीच्या या विकास प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे. सदर निविदेला सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक ११ नोव्‍हेंबर २०२२ रोजीच्‍या आदेशान्‍वये मान्‍यता दिली आहे. या संदर्भात पुरातत्व विभागाची परवानगी देखील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार लवकरच प्राप्त करणार आहेत.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात श्री महाकाली मंदीर देवस्‍थान परिसराच्‍या विकासासाठी ६० कोटी रू. निधी मंजूर करविला. गोंडकालीन इतिहासाची साक्ष देणा-या विदर्भातील अष्‍टशक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महाकाली मंदीर परिसराच्‍या विकासासाठी दिनांक १९ सप्‍टेंबर २०१९ च्‍या नगरविकास विभागाच्‍या शासन निर्णयान्‍वये मान्‍यता देण्‍यात आली आहे. महाकाली मंदीर विकास कार्यक्रमाअंतर्गत गोंडकालीन स्‍थापत्‍य व शिल्‍पकला जपून त्‍याचाच आधार घेवून दोन टप्‍प्‍यात विकास आराखडा तयार करण्‍यात आला आहे.
टप्‍पा-१ अंतर्गत धर्मशाळा इमारत, स्‍वयंपाक घर, भाविकांसाठी दर्शन रांगा, दुकाने, मुख्‍य प्रवेशद्वाराचे बांधकाम, फ्लॅग पोस्‍ट, मंडप परिसराचा विकास, मुख्‍य प्रवेशद्वारावर शिल्‍पकला तयार करणे, संरक्षण भिंत तसेच अस्‍तीत्‍वात सोयीसुविधांची पुर्नबांधणी करणे या गोंष्‍टींचा अंतर्भाव टप्‍पा १ मध्‍ये आहे. यासाठी मंजूर ६० कोटी रु निधी डिपॉझिट झाले असल्याने कामामध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
टप्‍पा –२ अंतर्गत अतिविशिष्‍ट व्‍यक्‍तींकरिता प्रवेशद्वार, माता महाकालीची ८० फुट उंच मुर्ती, दिपस्‍तंभ, संग्रहालय, घाट परिसराचा विकास, मनोरे, मंदीर परिसराचा विकास याबाबींचा समावेश आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाच्‍या काळात चंद्रपूरच्‍या या आराध्‍य दैवताच्‍या मंदिर परिसराच्‍या विकासासाठी घेतलेला पुढाकार आता मुर्त स्‍वरूपात साकार होत आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून चंद्रपूरकरांच्‍या श्रध्‍देशी निगडीत हा प्रकल्‍प मार्गी लागणार आहे. या विकासकामाशी संबंधित निविदेला शासन मान्‍यता मिळाल्‍याने या महत्‍वपूर्ण प्रकल्‍पाचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत