गडचिरोली:- मासे पकडण्यासाठी मेडीगड्डा बॅरेजच्या खोल पाण्यात गेलेल्या युवकाची बोट बुडून झालेल्या अपघातात एका तरुणाला प्राण गमवावे लागले. हा अपघात गुरुवारी (दि.२४) झाला. विशेष म्हणजे, शुक्रवारी त्याचे साक्षगंध होणार होते. पण साक्षगंधाच्या दिवशीच त्याचा मृतदेह हाती लागला. या अपघातात इतरही दोघे पाण्यात पडले. पण ते पोहत काठावर आल्याने बचावले.
प्राप्त माहितीनुसार: सिरोंचा तालुक्यातील कमलापेट गावातील गग्गुरी मधुकर, तोटा समैया आणि आणखी एक सहकारी असे तिघे जण गुरुवारी मेडीगड्डा बॅरेजच्या खाली असलेल्या वेशीवर छोट्या नावेतून मासेमारी करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास ते जाळ्यात अडकलेले मासे आणण्यासाठी पाण्यात गेले. या दरम्यान मेडीगड्डा बॅरेजमधून सोडलेल्या पाण्यामुळे गेटवर पाण्याचा वेग वाढला. त्यामुळे नावेत जोराने पाणी आले आणि त्यांची नाव खडकावर आदळून तिचे तुकडे झाले. यामुळे बोटीतून पाण्यात पडलेल्या तिघांची तारांबळ उडाली.
यात दोघांनी पोहत येऊन कसाबसा किनारा गाठला, पण तोटा समैयाला पोहून तिरावर जाणे शक्य झाले नाही. शुक्रवारी त्याचा मृतदेहच हाती लागला. साक्षगंधाच्या पूर्वसंध्येला हा अपघात घडल्यामुळे दोन्ही कुटुंबांसह गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.