पोंभूर्णा:- तालुक्यात सध्या अवैध रेती वाहतुकीने कहर केला असून प्रशासनाकडुन आर्थिक गणित डोळ्यासमोर ठेवत सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. पोंभूर्णा तालुक्यातील अंधारी नदी काठावर रेतीचे मोठे-मोठे उंच असे ढिगारे उभारले आहेत व त्या ढिगाऱ्यावरून भरदिवसा पोकलॅन्ड व जेसीबीच्या साह्याने दहा- बारा चाकी ट्रक-टिपर मध्ये भरुन राजरोसपणे रेतीची वाहतूक होत आहे. त्याच स्टाॅक रेती ढिगाऱ्यावर मध्यरात्री नदीतून उत्खनन करुन रेती टाकल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.
ट्रॅक्टर वाले सुद्धा रात्री चोरट्या मार्गाने अवैद्य रेती तालुक्यातील गावा-गावांत व बांधकाम साईटवर टाकत आहेत.महसूल प्रशासनाचे कर्मचारी असताना अवैध रेती वाहतुकीसाठी ढिगारे कुणाच्या परवानगीने मारले जात आहेत असा सवाल जनतेतुन विचारला जात आहे. तालुक्यात अंधारी व वैनगंगा नद्या आहेत. या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध असल्याने मागिल वर्षी चेक वेळवा, आष्टा, घाटकूळ, चेक बल्लारपुर-१ व चेक बल्लारपर-२ असे पाच घाट लिलाव झाले होते.या घाटावर उत्खनन १०जून पर्यंत तर वाहतुकीची मुदत १६ ऑक्टोंबर पर्यंत होती. मात्र ह्या घाटाच्या काठावर व भीमणी रस्त्यालगत मोठ -मोठे रेती ढिगारे असुन त्या ढिगाऱ्यांसाठी वाहतुकीची परवानगी नसल्याने ढिगारे उभे आहेत मात्र रेती माफियानी नवी शक्कल लढवत रेती उत्खनन सोबत वहातूक होत असुन सबंधीत प्रशसानाचे याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
रेती माफियांना नेमके अभय कुणाचे?
अवैध रेतीचोरी कारवाई थंडबस्त्यात आहे. प्रशासनाला लाखो रुपयाचा चुना लावला जात असुन, वाळु माफियांना कारवाईची भिती नाही.कुठल्याही महसुल अधिकाऱ्यांचे व पोलीस अधिकाऱ्यांचे वचक नसल्यामुळे दिवसाढवळ्या खुलेआम रेती वाहतूक होत आहे. या परीसरात दिवसा अवैध रेती वाहतुक करतांना अनेक विना नंबर प्लेटच्या वाहनांचा सुळसुळाट झाला आहे.यात ट्रॅक्टर,टिप्पर यासह अन्य वाहनांचा समावेश होत आहे.त्यामुळे वाळु तस्करांचे चांगभले होत आहे.वाळु तस्कर राञीचा दिवस करून नदि पात्रात ट्राक्टरने व टिप्परमध्ये जेसीबीच्या सहाय्याने रेतीऊपसा करीत आहेत. मुख्य मार्गावरुन रेतीची अवैध वाहतुक केली जात आहे.यावर ठोस कारवाई होतांना दिसत नाही.