रामाळा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीने चंद्रपूरकर त्रस्त #chandrapur #ramala #Lake #RamalaLake

Bhairav Diwase


चंद्रपूर:- शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाचे जलप्रदुषण टाळण्याकरिता तलावात येणारा मच्छीनाला त्वरित वळते करून जल शुद्धीकरण संयत्र उभारणे गरजेचे आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे. चंद्रपूर शहर हे गोंडकालिन शहर आहे. गोंडराजांनी शहरात किल्ला, परकोट व रामाळा तलावाची निर्मिती केली. सुमारे ५०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन इतिहास असलेला रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असल्याने आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र तलावाचे सौंदर्य व व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले.
तलावातील पाणी प्रदुषित होण्यासाठी मच्छीनाला व शहराच्या उत्त्तरेकडून वाहणारे नाल्यातील सांडपाणी कारणीभूत आहे. बाजुला बायपास नाला असतानाही हे सांडपाणी तलावात येत आहे. रामाळा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीने सध्या चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. सामाजिक संघटनांच्या दबावानंतर कोरोना काळात या तलावातील पाणी सोडून तलावाचे खोलीकरण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात झालेल्या या कामामुळे रामाळा तलावाची साठवण क्षमता वाढली आहे.
सध्या रामाळा तलावातील पाणी स्थिर असून यामुळे तलावात मोठ्या संख्येत शेवाळ साचल्याने तलावाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास होत आहे. परिणामी पुन्हा एकदा रामाळा तलाव महाकाय गटार झाला आहे. दुर्गंधीचा त्रास तातडीने कमी व्हावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.