नरेंद्र पिसे यांचे निधन #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर : शहरातील गणेशनगर तुकुम येथील निवासी आणि सध्या पुणे येथे आयसीआयसीआय बँकेत कार्यरत नरेंद्र उर्फ मुन्ना विजयराव पिसे यांचे शनिवारी, ५ नोव्हेंबरला मध्यरात्री निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. उद्या रविवारी ६ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. शांतिधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सुमारे १९९६ मध्ये नरेंद्र पिसे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जुळले. तेव्हापासून आजपर्यंत ते सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका असो की अन्य सामाजिक उपक्रम यात नरेंद्र पिसे यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. पुणे येथे नोकरीच्या निमित्ताने गेल्यानंतर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत नियमित जात होता. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावाने त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. निधनाचे वृत्त समजताच मित्र, चाहत्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. नरेंद्रच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.