Top News

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरच्या 'या' गावांचाही प्रश्न गंभीर #Jivati #Maharashtra #Telangana



चंद्रपूर:- तेलंगणा राज्याच्या सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ मराठी भाषिक गावांचा प्रश्न मात्र प्रलंबित आहे. या गावांवर तेलंगणा गेल्या काही वर्षांपासून दावा करत असून, त्या भागात विकास कामेही करीत आहे. त्याचे फलकही या गावांमध्ये लागले आहेत. या गावातील नागरिकांनी त्यास विरोध करून आम्ही महाराष्ट्रात आहोत, असे सांगितले. तसेच राज्य शासनाने याची दखल घ्यावी, अशी विनंतीही केली.

तत्कालीन आंध्रप्रदेश सरकारने जिवती तालुक्यातील १४ गावांवर दावा केल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. ही सर्व गावे मराठी भाषिक आहेत. १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निर्वाळा महाराष्ट्राच्या बाजूने दिला होता. त्यानंतरही आजपर्यंत ही गावे पूर्णत: महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकली नाहीत. या गावांमध्ये दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती, अंगणवाडी, रुग्णालये अस्तित्वात आहेत. गावातील नागरिकांची नावे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या मतदार यादीत आहेत. एकीकडे राज्य सरकार कर्नाटक सीमेवरील गावांचा वाद मिटविण्यासाठी तातडीने पावले टाकत असताना, तेलंगणा सीमेवरील १४ मराठी भाषिक गावांच्या वादाबाबत मौन का बाळगून आहे, असा सवाल संबंधित गावातील नागरिक विचारत आहेत.

तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील परमडोली, मुकदमगुडा, कोठा (बु.), महाराजगुडा, अंतापूर, येसापूर, लेंडिगुडा, पळसगुडा, परमडोली तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, पद्मवती, इंदिरानगर, भोलापठार अशी १४ गावे सीमावादात अडकली आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने