बल्लारपूर:- बल्लारपूर येथील रेल्वे लोखंडी पुलाचा काही भाग तुटल्याने घडलेल्या अपघातात निलीमा भिमराव रंगारी (वय ४८, रा. बल्लारपूर) यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूनंतर रंगारी परिवाराने सामाजिक जाणीवेतून शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथील नेत्रपेढीला निलिमाचे नेत्रदान केले. दु:खाच्या प्रसंगी रंगारी परिवाराचा हा निर्णय समाजाला दिशा देणारा आहे.
रविवारी (दि.२७) सायंकाळी पाचच्या सुमारास बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्र. 1 व 2 वरील पादचारी लोखंडी पूलाचा काही भाग कोसळला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निलिमा रंगारी या शिक्षिकेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रंगारी कुटुंबियांनी निलिमाचे मरणोत्तर नेत्रदान केले. गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील निधी ही पुणे येथे शिक्षणासाठी रविवारी जात होती. तिला सोडण्यासाठी तिच्या कुटुंबियांसह निलिमा रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. यावेळी हा अपघात झाला होता.