बैलाने धक्का दिल्याने शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू #chandrapur #chimur #death

Bhairav Diwase


चिमूर:- विहिरीवर बैलाला पाणी पाजत असताना बैल बुजून लागलेल्या धक्क्यात शेतकरी विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना आज ( दि.23) चिमूर येथे घडली. राष्ट्रीय शेतकरी दिनीच शेतकऱ्याचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नारायण अप्पाजी लोथे (वय 58) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी, आज शुक्रवारी चिमूर येथील आठवडी बाजार भरतो. गांधी वार्डाजवळ अप्पाजी लोथे हे भाजीपाल्याचे दुकान लावतात. ते शेतात भाजीपाल्याची लागवड करतात. तसेच काही भाजीपाला बाहेरून विकत आणतात. आज बाजार असल्याने दुकान लावण्याची सकाळपासून लगबग सुरू होती. दहाच्या सुमारास त्यांनी बाजारात भाजीपाला दुकान थाटले.

दरम्यान, दुपारी दीड वाजता शेतात बांधलेल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी ते शेतात गेले होते. विहिरीजवळ पाणी पाजण्याकरीता टाका बांधला आहे. तेथे त्यांनी दोन्ही बैल पाणी पिण्यासाठी बांधले. आणि ते जवळच भाजीपाला पाण्याने साफ करत होते. दरम्यान अचानक दोन्ही बैल बुजाडले. त्यामुळे बैलाचा जोरदार धक्का लागल्याने ते थेट विहिरीत कोसळले. विहिरीत गाळ असल्याने ते गाळात रुतले. त्यामुळे त्यांना बाहेर येता आले नाही. शेतातील काम करणाऱ्या एका महिलेने याची माहिती दिली. त्यांच्या पश्चात पत्नी आहे.