आगामी काळात शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये खेळासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण- डॉ. सुहास दिवसे #Pune

Bhairav Diwase
0


पुणे:- आगामी कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये १० ते १२ खेळासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण केंद्र, तर जिल्हा व विभागीय संकुलांमध्ये विविध खेळांची प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्यावर भर देण्यात येणार आहेत,असे प्रतिपादन क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतिने शिवछत्रपती क्रीडा संकुलात २४ ते २७ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे उदघाटन क्रीडा आयुक्त डॉ. दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. दिवसे म्हणाले, सध्या खेळ व क्रीडा क्षेत्राचे महत्व वाढलेले दिसून येत आहे. क्रीडा प्रशिक्षक हा खेळाडूसाठी आदर्श असतो, त्यांचा क्रीडा मुल्ये रुजविण्यात मोठा वाटा असतो. खेळाडू हा केंद्रबिंदू मानून खेळाडूंच्या हिताच्या योजना, दर्जेदार क्रीडा मार्गदर्शक व आवश्यक क्रीडा सुविधा निर्मीतीवर भर देऊन खेळाडू उपयोगी योजना कार्यान्वित केल्या जातील.

यावेळी महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटनेचे उपाध्यक्ष संदिप जोशी , क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तांत्रिक अधिकारी प्रमुख सविता मराठे, स्पर्धा संचालक प्रविण ढगे व योगेश शिर्के हे उपस्थित होते.

स्पर्धेत राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अशा एकुण नऊ विभागातून ६०० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत.

स्पर्धेच्या प्रारंभी क्रीडा आयुक्त यांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला. तर पुणे जिल्ह्याचा राष्ट्रीय खेळाडू हर्ष धुमाळे याने स्पर्धेतील खेळाडूंना शपथ दिली. क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)