चुकीचे पंचनामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा
पोंभूर्णा:- तालुक्यातील वेळवा माल,वेळवा चक,सेल्लूर नागरेड्डी,सेल्लूर चक, येथील अतिवृष्टी व पूर बाधीत शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे पिकाची आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावे व चुकीचे पंचनामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबित करावे या प्रमुख मागणीला घेऊन मंगळवारपासून शेतकऱ्यांनी पोंभूर्णा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
पोंभूर्णा तालुक्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर २०२२ या महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे धान, कापूस, सोयाबीन,या पिकांची खुप मोठी नुकसान झाली.वेळवामाल,वेळवा चक,सेल्लूर नागरेड्डी,चेक सेल्लूर या गावाला लागून नदी,नाले,तलावाने वेढलेले आहे.सततच्या पावसामुळे या भागात पुरपरस्थिती निर्माण झाली होती.यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे फार मोठे नुकसान होऊन फक्त हाती ३० टक्केच उत्पन्न हाती आले. मात्र शासनस्तरावरून होणारे सर्वे घरी बसून व बोगस पद्धतीने व प्रत्यक्षात न झाल्यामुळे अनेक शेतकरी या आर्थिक नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागले.यामुळे येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई १३६०० रूपये हेक्टरी देण्यात यावे, चुकीचे पंचनामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे,ज्या शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई मिळाली त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन प्रशासनाच्या बोगस पद्धतीचा विरोध करीत शेतकऱ्यांनी पोंभूर्णा तहसिलसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, अजय लोणारे, श्रीकृष्ण चलाख यांची उपस्थित होते.
उपोषणकर्ते शेतकऱ्यांमध्ये मधुकर मेश्राम, सुरेश लोणारे,दौलत देवगडे, रामचंद्र कुंभरे, शामराव आत्राम, सखाराम कन्नाके, नामदेव आत्राम, वासुदेव कावटवार यांनी उपोषण सुरू केले आहे.