कोळशाच्या अवैध साठ्यावर धाड....... #Chandrapur

Bhairav Diwase


कोरपना:- जिल्ह्यात कोळशाच्या खाणी मोठ्या संख्येने असल्याने कोळसा माफियांनी डोके वर काढले आहे. कोळशाचा चोर बाजार जिल्ह्यात तेजीत आहे. अनेकांना कोळशाच्या काळ्या बाजारातून कोट्यवधींची माया जमविली आहे. कोळसा परिसररात सिमेंट उद्योगांमुळे कोळशाला मोठी मागणी असून, अनेकांनी अवैध कोळसा व्यापार सुरू केला आहे. ठिकठिकाणी कोळशाचे स्टॉल्स दिसून येत आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी सोमवारी परिसरातील अवैध कोळसा साठ्यांवर धाडी घालून लाखो रुपये किमतीचा कोळसा साठा जप्त केला आहे. या कारवाईने कोळसा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कोरपना तालुक्यात असलेल्या कोळसा खाणी आणि सिमेंट उद्योगामुळे कोळशाची मोठी मागणी आहे. कोळसा खाणीतून कोळशाची मोठमोठ्या वाहनातून दिवसरात्र वाहतूक सुरू असते. त्यामुळे कोळसा तस्कर सक्रिय झाले असून, कोळशाची अवैद्य तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरम्यान, गडचांदूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे अवैध कोळसा साठ्याबाबत तक्रारी मिळताच त्यांनी सोमवारी कोळसा साठ्यांवर धाडसत्र राबवून लाखो रुपये किमतीचा कोळशाचा साठा जप्त केला आहे. हा कोळसा खुल्या मार्केटमध्ये विकला जात आहे.

ट्रकव्यावसायिक आणि कोळसा व्यापारी यांच्या संगणमतातून हा गोरखधंदा मागील काही वर्षांपासून सुरू आहे. धानोरा- गडचांदूर मार्गावर भोयगावजवळ असलेल्या अवैध कोळसा स्टॉलवर नायक यांनी धाड घातली. यावेळी अनेक कोळसा व्यावसायिकांच्या मुसक्या त्यांनी आवळल्या. भोयगाव-कवठाळा मार्गावरील एका स्टॉलवरून २५ ते ३० टन साठा जप्त करण्यात आला. हा कोळसा स्टॉल चंद्रपुरातील फारूख शेख नामक व्यक्तीचा असल्याची माहिती असून, पोलिसांनी फारूख शेखसह दोघांवर गुन्हे दाखल केले आहे. कोळसा स्टॉल्सवर एसडीपीओ नायक दाखल होताच अनेक कोळसा तस्करांमध्ये धावपळ उडाली. ही कारवाई एसडीपीओ नायक यांच्या नेतृत्वात गडचांदूरचे ठाणेदार सत्यजित आमले, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्या पथकाने केली.