Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

संतप्त विद्यार्थ्यांची बसस्थानकावर धडक #chandrapur



चंद्रपूर:- घुग्घुस थून जवळच असलेल्या नायगाव (बु.) येथील संतप्त विद्यार्थ्यांनी पालकांसह गुरुवार, 22 डिसेंबर रोजी सकाळी घुग्घुस बसस्थानकावर धडक देत बससेवेच्या समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली.


मागील पाच महिन्यापासून चंद्रपूर आगाराच्या बसेस यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील नायगाव मार्गे ये-जा करीत नाहीत. त्यामुळे नायगाव येथील विद्यार्थ्यांना एक किलोमीटरपर्यंत चंद्रपूर-यवतमाळ राज्य महामार्गांवरील बेलोरा फाट्यापर्यंत सकाळी व सायंकाळी पायदळ ये-जा करावी लागते. याचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नायगाव येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घुग्घुस शहरात यावे लागते यासाठी त्यांनी शैक्षणिक सत्रासाठी पैसे भरून परवाना काढला आहे. बस ये-जा करीत नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मागील तीस वर्षापासून सर्वसाधारण बसेस नायगाव मार्गे सुरु होत्या. नायगाव लगत पाच गावे आहे. येथून विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना शिक्षण, रुग्णालय, बाजार आदी करिता घुग्घुसकडे ये-जा करावे लागते.

नायगावमार्गे बस येत नसल्याने संतप्त झालेल्या 16 विद्यार्थी, पालक व प्रवाशांनी घुग्घुस बसस्थानकावर धडक दिली. याबाबत कळताच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी तिकडे धाव घेतली. माजी जि. प. सदस्य विजय पिदूरकर व बोढे यांनी चंद्रपूर आगार व्यवस्थापनाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली व समस्या सांगितली. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. तात्काळ समस्या न सोडविल्यास चंद्रपूर आगाराच्या बसेस यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरील बेलोरा पुलाजवळ थांबवू, असा इशारा पिदूरकर यांनी दिला. यावेळी पालक प्रतिनिधी श्रीराम राजूरकर, विठ्ठल ठाकरे यांच्यासह विद्यार्थी, पालक व प्रवासी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत