वनविभाग कार्यालयावर महिलांचा मोर्चा #chandrapurमुल:- मुल तालुक्यातील चिरोली परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन महिन्यांत वाघाने ३ नागरिकांचा बळी घेतल्याने शेतकरी, मजूर वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मात्र, वनविभागाकडून मानव-वण्यजीव संघर्ष टाळण्याकरिता कुठलीही उपाययोजना करण्यात न आल्याने चिरोली येथील शेकडो महिलांनी वनविभाग कार्यालावर मोर्चा काढत वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली.

मुल तालुक्यातील अनेक गावे ताडोबा बफरझोन क्षेत्राअंतर्गत येतात. बफरझोन क्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मानव-वन्यप्राणी संघर्षात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मात्र, मानव वन्यप्राणी संघर्ष टाळण्याकरिता वनविभागाकडून ठोस पाऊल उचलले जात नसल्याने नागरिकांकडून वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नरभक्षक वाघाच्या भीतीने शेतक-यांचे शेतावरिल कामे बंद झाली आहेत. त्यामुळे संतप्त महिलांनी चिरोली येथील प्रादेशिक वनविभागाच्या क्षेत्रकार्यालयावर मोर्चा काढत नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

मुल पंचायत समितीच्या माजी सदस्या वर्षा लोनबले, चिरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनल लेनगुरे, माजी उपसरपंच कविता सुरमवार, सदस्य धीरज वाळके, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रामटेके यांच्या उपस्थितीत मुलचे क्षेत्रसहाय्यक एम. जे. खनके यांना निवेदन दिले. यावेळी गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या. यावेळी वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याचे आश्वासन वनाधिका-यांनी दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या