Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

संतोष कुळमेथे करणार प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर पथसंचालन #chandrapur


चंद्रपूर:- राष्ट्रीय सेवा योजना गोंडवाना विद्यापीठाचा स्वयंसेवक संतोष कुळमेथे (सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर) यांची युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार अधीन राष्ट्रीय सेवा योजनाद्वारे प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणार्‍या पथसंचालनसाठी निवड झालेली आहे.


गोंडवाना विद्यापीठ आदिवासी बहुल भागात असले तरी येथील विद्यार्थी हे कोणत्याही स्पर्धेत कमी नाहीत हे या निवडीतून दिसून येते. दरवर्षी कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी पथसंचालन होत असून त्यात राष्ट्रीय सेवा योजनाचा संघ सुद्धा सहभागी होत असतो. त्यासाठी संपूर्ण भारतातून जिल्हास्तरीय, विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय व झोनस्तरीय निवड प्रक्रिया होत असते. या सर्व निवड प्रक्रियेत स्वयंसेवकांची शारीरिक चाचणी व सांस्कृतिक कार्यक्रमातून सुद्धा चाचणी घेतली जाते.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा 8 स्वयंसेवकांचा संघ कोल्हापूर येथील राज्यस्तरीय निवड शिबिरात सहभागी झालेला होता. यातून संतोष कुळमेथे या स्वयंसेवकांची निवड वेस्ट झोनस्तरीय निवड शिबिरासाठी झालेली होती. या स्वयंसेवकांनी सरदार पटेल विद्यापीठ आनंद, गुजरात येथील शिबिरात सहभाग घेतला. त्यातून संतोषची निवड प्रजासत्ताक दिनी होणार्‍या पथसंचालनसाठी झालेली असून संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वयंसेवकातून संतोष प्रथम क्रमांकावर आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेपासून पहिल्यांदा विद्यापीठाचा स्वयंसेवक पथसंचालनात सहभागी होणार आहे. ही बाब नक्कीच विद्यापीठासाठी गौरवाची आणि अभिमानाची आहे. या निवडीसाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे तसेच दोन्ही जिल्ह्यातील कार्यक्रम अधिकारी यांनी संतोषचे कौतुक करत अभिनंदन केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत