साहित्य-संस्कृतीत विदर्भाचे योगदान महत्वाचे ‘इतिहासातल्या पानातील विदर्भ आणि साहित्य’ या चर्चेचा सूर #chandrapur

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- विदर्भ ही प्राचीन कला, साहित्य व संस्कृतीची खाण आहे. देशाच्या विविध साहित्य संस्कृतीचा विचार करताना तो विदर्भाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. साहित्य संस्कृतीत विदर्भाचे योगदान महत्वाचे असून, हा अमुल्य वारसा जपण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असा सूर वक्त्यांनी व्यक्त केला.

चंद्रपुरातील 68 व्या विदर्भ साहित्य संमेलनात शनिवार, 17 डिसेंबर रोजी ‘इतिहासातल्या पानातील विदर्भ आणि साहित्य’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात वक्ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रशेखर गुप्ता होते. तर, डॉ. रमा गोळवलकर, डॉ. शैषशयन देशमुख, प्रविण योगी विचारपिठावर उपस्थित होते.

यावेळी गुप्ता म्हणाले, विदर्भाला साहित्य संस्कृतीचा प्राचिन इतिहास लाभला आहे. विविध साहित्य, मंदिर, मूर्ती, शिल्पकलेने हा प्रदेश नटलेला आहे. वाकाटक काळातील अनेक ताम्रपत्र या भागात आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यात माणिगड येथे परमार वंशाचे अस्तित्व होते. भोजदेव हा या वंशाचा शेवटचा राजा होता, अशी माहिती देत विदर्भाचा दुर्लक्षित इतिहास समोर आणण्याचे आवाहन त्यांनी केले. 

डॉ. रमा गोळवलकर यांनी, विदर्भातील कर्तृत्वान पंचकन्या व सुना यांची माहिती दिली. विदर्भाची कन्या इंदूमती, रुक्मिणी, दयमंती, लोपामुद्रा, जीजाबाई आणि सुना प्रभावती गुप्ता, राणी हिराई यांच्या सामाजिक योगदानाबाबत विवेचन केले.

  प्रविण योगी यांनी ‘विदर्भातील मंदिर स्थापत्य व मूर्ती’ या विषयावर प्रकाश टाकला. विदर्भातील भव्य मंदिरे हे विदर्भ हा समृध्द भाग असल्याचे प्रतिक असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी केवल नरसिंह मंदिर, त्रिविक्रम मंदिर, मार्केंडा मंदिर, दैत्यसूदन मंदिर आदींसह पवनार येथील खोदकामात सापडलेली गंगा भगवती मूर्ती, मनसरच्या उत्खनात सापडलेली बालशिवाची मूर्ती, मार्केंडा मंदिरातील चर्तुपाद सदाशीव मूर्ती, रावणाची शिव पूजा मूर्ती, चामुंडा मूर्ती, नृत्य गणेश आदी मूर्तीचे वैशिष्ट्य व कलात्मकता कथन केली. 

डॉ. शैषाशायन देशमुख यांनी, विदर्भातील 11 शिलालेखांची माहिती दिली. नागभीड येथील देवटेक शिलालेख, भंडारा जिल्ह्यातील पौनी येथील महाक्षप्रप रुपिअम्म शिलालेख, वाशिम येथील वाकाटक देवसेन शिलालेख, रामटेक मंदिरातील लक्ष्मण मंदिरातील शिलालेख, भद्रावती येथील भद्रनाग मंदिरातील शिलालेख, देवगिरी यादव शिलालेख, मार्कंडा मंदिरातील शिलालेख या शिलालेखांचा उल्लेख त्यांनी केला. हा वारसा आज वेगाने नष्ट होत आहे. तो जपला नाहीतर पुरावे देणे कठीण होईल. त्यामुळे हा अमुल्य वारसा जपण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सीमा पाटील यांनी, तर आभार संगीता पिदूरकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)