Click Here...👇👇👇

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्‍दी महा‍मार्गाचा विस्‍तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करावा- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी #chandrapur

Bhairav Diwase

मुख्‍यमंत्र्यांनी केली मागणी मान्‍य

त्‍वरीत निधी उपलब्‍ध करत जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे मुख्‍यमंत्र्यांचे निर्देश


चंद्रपूर:- हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्‍दी महा‍मार्गाचा विस्‍तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करण्‍याची मागणी चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री तथा वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे केली. ही मागणी मान्‍य करत मुख्‍यमंत्र्यांनी पुढील कार्यवाही तातडीने करण्‍याचे निर्देश संबंधितांना दिले.

दिनांक २३ डिसेंबर रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदन सादर केले व चर्चा केली. चंद्रपूर जिल्‍हा हा आदिवासीबहुल, वनव्‍याप्‍त जिल्‍हा असून ताडोबा सारख्‍या राष्‍ट्रीय उद्यानाला देशविदेशातुन पर्यटक भेट देण्‍यास येत असतात. हा जिल्‍हा विविध खनिजांनी समृध्‍द असून जिल्‍हयाची अर्थव्‍यवस्‍था विद्युतनिर्मीती, खनिज उद्योग व सिमेंट उद्योगाभोवती केंद्रीत आहे. त्‍यामुळे राज्‍याच्‍या या भागातील वाहनांना देखील समृध्‍दी महामार्गाद्वारे मुंबईकरिता सर्वात कमी अंतराची तसेच जलदगती महामार्गाची सुविधा उपलब्‍ध होवू शकेल. यासंदर्भात दिनांक ६ जुलै २०२२ रोजी मी आपली भेट घेत निवेदन सादर केले होते. त्‍यामुळे आपण दिलेल्‍या निर्देशानुसार प्रस्‍ताव सुध्‍दा पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्‍यात आला. 

दिनांक २९ सप्‍टेंबर २०२२ रोजीच्‍या पत्रान्‍वये नागपूर मुंबई सुपर कम्‍युनिकेशन एक्‍सप्रेसवे लिमीटेड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून समृध्‍दी महामार्गाचा नागपूर ते चंद्रपूर-राजुरा पर्यंत विस्‍तार करण्‍यासाठी सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल तयार करण्‍यासाठी व भूसंपादन करण्‍यासाठी अंदाजे २० कोटी रू. निधी महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाला उपलब्‍ध करून देण्‍याची विनंती केली होती. अद्याप त्‍यांच्‍या सदर विनंतीला मान्‍यता मिळालेली नाही. याबाबत मुख्‍यमंत्र्यांनी स्‍वतः लक्ष घालुन या अहवालाला मान्‍यता देण्‍याचे निर्देश द्यावे, अशी विनंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांना केली.

याबाबतच्‍या अहवालाला त्‍वरीत मान्‍यता देण्‍यात यावी व निधी उपलब्‍ध करण्‍याबाबत सुध्‍दा त्‍वरीत कार्यवाही करावी व पुढील कार्यवाही जलदगतीने करण्‍याचे निर्देश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्‍काळ दिले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्‍यक्‍त केले.