Top News

इथे अनोळखी मुस्लिम महिला हिंदू महिलेला रक्त देते तेव्हा...... #Blooddonation #chandrapurचंद्रपूर:- फातिमा पट्टावाला या बोहरा समाजाच्या महिलेने एका नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला रक्तदान करून तिचा व बाळाचा जीव वाचविला. या अनोख्या रक्तदानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मूळचे वर्धा येथील रहिवाशी असलेले पोलीस उपनिरीक्षक रोहन परतेकी रामनगर ठाण्यात कर्तव्यावर आहेत. त्यांची पत्नी नऊ महिन्यांची गरोदर आहे. १० जानेवारी रोजी पोलीस भरतीत व्यस्त असलेल्या परतेकी यांना प्रसुती रुग्णालयातून फोन आला. तुमच्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन या, असे त्यांना सांगण्यात आले. पोलीस भरती सुरू असल्याने परतेकी यांनी वरिष्ठांना कल्पना देत थेट हॉस्पिटल गाठले. त्यानंतर पत्नीला घेऊन धांडे हॉस्पिटलला गेले. तुमच्या पत्नीच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. त्यामुळे प्रसुतीत समस्या निर्माण होऊ शकतात. पत्नीचा रक्तगट O+ असल्याने तुम्ही त्याची व्यवस्था करा, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले.

चंद्रपूर शहर नवीन, कुणीही नातेवाईक नाही. यामुळे परतेकी चिंतेत पडले. त्यांनी मित्र तुषार येलमे याला फोन केला आणि पत्नीला तत्काळ रक्ताची गरज असल्याचे सांगितले. त्याने १० मिनिटांत रक्ताची जुळवाजुळव केली. यानंतर परतेकी यांना सुखद अनुभव आला.

मित्राने रक्ताची व्यवस्था झाल्याचे सांगितले आणि मी लगेच रक्तपेढीत गेलो. तेथे पुरुष रक्तदात्याला शोधू लागलो. तेथे कोणी पुरुष दिसला नाही आणि माझ्यासमोर एक मुस्लीम महिला उभी ठाकली. तिला विचारले की आपण रक्त देण्यासाठी आला आहात? तिने लगेच हो म्हटले आणि तुषारचे नाव सांगितले. बुरखा घातलेल्या तरुणीचा होकार ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. कारण मी आतापर्यंत मुलींना सहजासहजी रक्तदान करताना बघितले नव्हते आणि ही ताई माझ्या अगोदर जाऊन रक्तदान करण्यासाठी तयार होती, असे परतेकी यांनी सांगितले.

मी तिला आणखी विचारले तर ती म्हणाली, माझे नाव फातिमा आहे आणि मी हकीम यांची बहीण आहे. माझे भाऊ हकीम हे गरजू लोकांना रक्तदान करण्याचे काम करतात त्यांची चंद्रपूर शहरात रक्तदात्यांची एक साखळी आहे. हकीम भैय्यानी मला सांगितले की, एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला रक्ताची गरज आहे त्यासाठी तू स्वतःच जा आणि मी लगेच आले. मी विचार केला की आजकाल विविध वाहिन्यांवर फक्त हिंदू-मुस्लीम याच विषयावर चर्चा जाणीपूर्वक घडवून आणल्या जातात. समाज माध्यमावर देखील लोक हिंदू मुस्लीम अशी भारताची विभागणी करतात. मात्र हे चुकीचे आहे, असे ती म्हणाली.

चंद्रपूरसारख्या शहरात हकीम भैय्या आणि त्यांची भगिनी फातिमा हे कोणताही जातीय भेदभाव न करता आपले रक्त गरजू लोकांना दान करून, हिंदु मुस्लिमचे रक्त एकच आहे, असे सांगत आहेत. आमचा फक्त एकच धर्म, तो म्हणजे माणुसकी, असा संदेश हकीम भैय्या आणि त्यांची भगिनी फातिमा आपल्या प्रत्यक्ष कृतीतून देत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने