Top News

दिलेला शब्द पाळणारा भाजप हा देशातील एकमेव पक्ष:- जे. पी. नड्डा #chandrapur #j.p.nada



चंद्रपूर:- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात यश मिळावे यासाठी जे. पी. नड्डा यांनी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या क्रीडांगणावर ‘विजय संकल्प’ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.


जे. पी. नड्डा म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी भ्रष्टाचाराची तीन दुकाने उघडली. सत्तेसाठी विचारांशी तडजोड करणाऱ्या अशा लोकांना माफी नाही. राजकारणात सत्याचा नेहमीच विजय होतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समोर माथा टेकता टेकता ठाकरे यांचा माथाच झुकला आहे. भाजपने जनाधार, जनधन, आधार व मोबाईल असा एकत्रित जॅम केला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मात्र ज्वाईन्टली एक्वायर मनी अशा पध्दतीने केवळ पैसा ओरबाडण्याचे काम केले. याच भ्रष्टाचारामुळे राज्यातील दोन मंत्री कारागृहात गेले. त्यातील एक माजी मंत्री नुकतेच कारागृहातून सुटून बाहेर आले तर एक कारागृहात अजूनही शिक्षा भोगत आहेत.

त्यावेळी त्यांनी ७५ हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. ते येथे रिपोर्ट कार्ड घेऊन आले होते. मोदी नेहमी जनतेमध्ये रिपोर्ट कार्ड घेऊन जातात, पण कॉंग्रेसचे नेते असं करू शकतात का? आमच्यासारखे आकडे ते देऊ शकतात, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला.

विदर्भातील चंद्रपूर आणि मराठवाड्यातील संभाजीनगर येथे त्यांच्या जाहीर सभा आहेत. त्यांपैकी चंद्रपुरात त्यांची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. नड्डा म्हणाले, महाराष्ट्रात यापूर्वी आघाडीची पिछाडी सरकार होती, पण आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. या सरकारमध्ये भ्रष्टाचार कमी झाला आणि विकासाच्या कामांनी वेग धरला. मोदी जेव्हा नागपुरात आले होते, तेव्हा त्यांनी ७५ हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. रेल्वेला १,५०० कोटी रुपयांचा प्रकल्प दिला. नाग नदीसाठी १,९२५ कोटीचा प्रकल्प, वंदे भारत ही नागपूर-विलासपूर रेल्वेगाडी सुरू केली.

नागपुरात मेट्रो फेज हा १८,६५० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू केला. ६,७०० कोटी रुपयांच्या मेट्रो फेज टू प्रकल्पाचे भूमिपूजन केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या ५२० किलोमीटर अंतराच्या नागपूर ते शीर्डीचे उद्घाटने केले. एक्सप्रेस हायवेसाठी ५५ हजार कोटी रुपये मंजूर केले. कॉंग्रेसचे नेते असे आकडे देऊ शकतात काय? मोदी रिपोर्ट कार्ड घेऊन जनतेमध्ये जातात. गेल्या महिन्यात १८ तारखेला १,८०० कोटी रुपयाच्या राज्यातल्या पहिल्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टरला मंजुरी मिळाली. यामध्ये अंदाजे २,००० कोटी रुपये खर्च होणार असून ५ हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. तर ५० हजार लोकांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार आहे, असे नड्डा म्हणाले.

महाराष्ट्र मॅगनेटीक आहे. या राज्यात विदेशातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली आहे. ३,७५,००० कोटींची विदेशी गुंतवणूक आली आहे. चंद्रपूरला मेडिकल कॉलेजची मान्यता दिली. जिल्हावासीयांसाठी ही आनंदाची बाब आहे. चंद्रपूर हा आदिवासीबहुल भाग आहे. सिकलसेल या आजाराचा मुद्दा सर्वप्रथम नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडला. मोठे रिसर्च सेंटर चंद्रपुरात बनत आहे. २००० कोटी रुपयांची गुंतवणूक जिल्ह्यात झाली आहे. नागपुरात एम्स येईल, असे येथील जनतेला कधी वाटले नसेल, पण ते करून दाखवले. आता विदर्भातील लोकांना इतरत्र जायची गरज नाही, असे जे. पी. नड्डा यांनी सांगितले.

काँग्रेसच्या काळात मेंदूज्वर, पोलिओ, जापनीज ताप यावर लस येण्यास अनेक वर्ष गेली. मात्र करोना संकटात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अवघ्या नऊ महिन्यात भारतात दोन करोना लसींची निर्मिती केली. कधीकाळी मोबाईल आयात करावे लागत होते. आज ९७ टक्के मोबाईलचे उत्पादन भारतात होते. प्रधानमंत्र्यांच्या पाच किलो गहू, तांदूळ, दाळ या मोफत धान्य योजनेचा लाभ ८० कोटी नागरिकांना होत आहे. परिणामी, भारतात अतिगरीबी एक टक्क्यापेक्षा अधिकने कमी झाली आहे. याप्रसंगी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचीही भाषणे झाली.

व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, बंटी भांगडीया, संजीवरेड्डी बोदकुरवार संदीप धुर्वे, देवराव होळी, समीर कुणावार, अशोक उईके, कृष्णा गजबे यांच्यासह धर्मपाल मेश्राम, चंदन व्यास, नितीन भुतडा, अतुल देशकर, संजय धोटे, राजेश बकाने, जमान सिद्दीकी, अर्चना डेहनकर, किसन नागदेवे, तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. संचालन ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तर आभार डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मानले. या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने