राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे #Industry #Eknathshinde #chandrapur #gadchiroli #Mumbai #Maharashtra

Bhairav Diwase

चंद्रपूरच्याही वाट्याला बरंच काही


मुंबई:- दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारने अवघ्या दोन दिवसांत विविध उद्योगांसोबत 1 लाख 37 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. या माध्यमातून राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे. दावोस परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार असल्याने विदेशी गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरील विश्वास वाढला असल्याचे सांगून, या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरच सुरू होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

जागतिक आर्थिक परिषदेत पुणे जिल्ह्यासह चंद्रपुर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे प्रकल्पांचे करार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातून हजारो रोजगार निर्माण होणार आहेत.पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट ॲटो सिस्टीम्सचा ४०० कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून दोन हजार जणांना रोजगार मिळणार आहे.

याशिवाय राज्यात विविध ठिकाणी गोगोरो इंजिनियरींग व बडवे इंजिनियरींगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा ॲटो प्रकल्प उभारण्याच्या करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पातून राज्यभरात विविध ठिकणी ३० हजार जणांना नोकऱ्या मिळणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प उभारण्याचा करार करण्यात आला असून या प्रकल्पातून १५ हजार जणांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.

तसेच, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे इस्त्रायलच्या राजूरी स्टील्स ॲण्ड अलॉईजचा ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प उभारण्याबाबत करार करण्यात आला असून यातून १ हजार जणांना रोजगार मिळणार आहे.

याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे ब्रिटनच्या वरद फेरो ॲलाँईजचा १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून दोन हजार जणांना रोजगार मिळू शकतो.

या करारांशिवाय जपानच्या बँकेसोबत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांच्यासोबत एक बैठक पार पडली.

या बैठकीत जपानी बँकेच्या सहकार्याने देशभरात ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या याठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.