तीर्थक्षेत्राला ऐतिहासिक महत्त्व; अंधारी नदीवर आहे भीमकुंड
पोंभुर्णा (पी.एच.गोरंतवार):- पोंभूर्णा तालुक्यातील थेरगाव-कोसंबी गावानजीक अंधारी नदीत महाकाय दगडावर असलेले कुंड व प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भीमकुंडावर महाशिवरात्रीनिमित्त हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळणार असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा येथे मोठी यात्रा भरणार आहे. भाविक येथे येऊन महाशिवरात्रीनिमित्त आंघोळीला येतात.आठवडाभर येथे भक्तीमय वातावरण असते.
अंधारी नदीतिरावर प्रभू श्रीरामाचे मंदिर असून काही पुरातन मुर्तीचे अवशेष येथे आहेत. येथील तीर्थक्षेत्राला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून नदीच्या पात्रात प्राचीन दगडाचे अवशेष आहेत. अंधारी नदीच्या कोसंबी घाट नदीपात्रात रुंद दगडावर भिमकाय पावलांचे ठसे, मानवीय अंगाच्या अवयवासारखे असलेले मोठे दगड, आणि एक दगडीकुंड आहे. याला लोकं भीमकुंड संबोधतात. यावरूनच भिमकुंड असे नाव पडले आहे.
द्वापरयुगात येथे भीम आला होता असे जुन्या लोकांचे म्हणणे आहे. दरवर्षी येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते. यात्रेला परिसरातील गावागावातून भाविक येथे येत असतात. आराध्याची पुजा अर्चा व आंघोळ करून कुंडावर आपल्या आरोग्य, समृद्धीसाठी परमेश्वराला मागणं मागतात. अंधारीनदीत आंघोळ केले की मनपवित्र होतो अशी लोक मान्यता आहे. नदीपात्रात व तिरावर पाल बांधून जत्थेच्या जत्थे स्वयंपाक करून नैवेद्य मंदिरात पोहचवून नंतरच उपवास सोडतात.
अंधारी नदीच्या तिरावर श्रीरामाचे मंदीर आहे. ते ३५ वर्षांपूर्वी स्व. गणपतराव धोडरे महाराज यांनी नव्याने मंदिर बांधले. दरवर्षी श्रीरामनवमीला येथे भजन कीर्तन, महाप्रसादाचे वितरण केले जाते. व महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते. श्रीराममंदिराच्या बाजूला बजरंगबलीचे मंदिर आहे. तसेच कचरू महाराजांची समाधीही बाजुला आहे. हिच मार्कंडा व हिच काशी म्हणत येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत असून या स्थळाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे अशी मागणी भाविकांकडून जोर धरू लागली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत